Headlines

हिंगोलीत पोलिसाच्याच घरात चोरी:उपनिरीक्षकाचे घर फोडले, 2.94 लाखांची रोख अन् दागिने पळवले, दोघांवर गुन्हा दाखल




हिंगोली शहरातील नवीन पोलिस वसाहतीमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरटयांनी 2.94 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 14 रात्री उशीरा दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे तोंडाला रुमाल बांधून असल्यामुळे आता त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील नवीन पोलिस वसाहतीमध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी राहतात. या ठिकाणी वसाहतीच्या सी विंग मध्ये उपनिरीक्षक शाम खुळे यांचे निवासस्थान आहे. शनिवारी ता. 12 त्यांचे कुटुंबिय बाहेरगावी गेल्यामुळे उपनिरीक्षक खुळे हे घराला कुलुप लाऊन कर्तव्यावर गेले होते. दरम्यान, घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी वसाहतीमध्ये जाऊन खुळे यांच्या निवासस्थानाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधुस केली त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे कुलुप तोडून कपाटातील साहित्या अस्ताव्यस्त केले. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 1.89 लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच 1.05 लाख रुपये रोख असा 2.94 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, उपनिरीक्षक खुळे हे कर्तव्यावरून परत आल्यानंतर घराचे कुलुप तोडलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक गजानन गिरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, एम. एम. शेख यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पसिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात दोन ते तीन चोरटे तोंडाला रुमाल बांधून पोलिस वसाहतीमध्ये आल्याचे दिसून आले. त्यावरून उपनिरीक्षक खुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 14 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक गिरी पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *