![]()
आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा, कोरडी पडलेली शेतजमीन आणि वाढत्या महागाईने रिकामा होत चाललेला खिसा… परिस्थिती बिकट असली तरी गणरायाच्या स्वागताचा उत्साह मात्र कायम आहे. श्रीरामपूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असताना गणेशभक्तांनी यंदा खर्चाला लगाम
.
पावसाअभावी खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. ग्रामीण भागात आर्थिक टंचाई निर्माण झाल्याने बाजारपेठेतील खरेदीवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यात गणेशमूर्ती, फुले, मिठाई आणि सजावटीच्या साहित्याच्या दरात सुमारे २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भक्तांनी मोठ्या मूर्तीऐवजी छोट्या आणि कमी किमतीच्या मूर्ती घेण्याला पसंती दिली.
खरेदीचा आवाका कमी झाला, पण गणरायावरील माया कमी झाली नाही. मोठा डामडौल टाळून अनेक मंडळांनी आणि घरगुती गणेशभक्तांनी साधेपणाने बाप्पाचे स्वागत केले. गणरायाच्या चरणी यंदा ‘पाऊस पडू दे, पिके बहरू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे’, अशीच आर्त प्रार्थना केली जात आहे. दुष्काळामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या वर्गणीतही काही प्रमाणात घट झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५९, तर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७०, अशी एकूण २२९ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. उत्सव काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
मूर्ती, फुले, मिठाई आणि सजावटीच्या साहित्याच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाली. दुष्काळ आणि घटलेल्या उत्पन्नामुळे भक्तांनी मोठ्या मूर्ती टाळून छोट्या मूर्तींना पसंती दिली. खरेदीला कात्री लागली; गणेशभक्तीला नाही.
आ. हेमंत ओगले यांनी डामडौल न करता सहकुटुंब गणेश मूर्ती घरी नेऊन स्थापना केली.
‘उत्सव करा; पण समाजासाठीही काही करा!’ यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गणेश मंडळांनी जलसंधारण, पाणीबचत, वृक्षारोपण किंवा पाणीटंचाई निवारणाचे उपक्रम राबवावेत. गणरायाचा उत्सव आणि समाजाचा विकास यांची सांगड घातल्यास भक्तीला खऱ्या अर्थाने सामाजिक दिशा मिळेल.
खंडाळ्यात नऊ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ^खंडाळ्यात गेल्या नऊ वर्षांपासून सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र येऊन एकच गणपती बसवतात. या उपक्रमाचा २०२२-२३ मध्ये पोलिस दलाने पुरस्कार देऊन गौरव केला. रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक, अशी उत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. — ॲड. चंद्रशेखर ढोकचौळे, अध्यक्ष, गणेशोत्सव समिती