Headlines

536 वर्षांच्या शहरात गणरायाची 125 वर्षांची परंपरा:नगरच्या गणेशोत्सवाची रंजक कहाणी, स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी‎




शहराचा इतिहास जवळपास ५३६ वर्षांचा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सव्वाशे वर्षांहून अधिक काळाची आहे. यादवकालीन किंवा मोडी लिपीतील उल्लेखांनुसार माळीवाड्यातील श्री विशाल गणपती हे सुमारे ७०० ते ८०० वर्षे जुने मंदिर शहराचे प्राचीन श्रद्धास्थान आहे. १८९३ नंतर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने नगरच्या पेठांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची पाळेमुळे रुजली. भिंगार येथील ऐतिहासिक देशमुख गणपती हा स्वातंत्र्यपूर्व काळातील श्रद्धास्थान आहे. स्थानिक देशमुख घराण्याने स्थापित केलेल्या या मानाच्या गणपतीला मोठी ऐतिहासिक परंपरा असून, ऐतिहासिक वाड्यात परंपरेनुसार, सामाजिक सलोखा व धार्मिक शिस्त जपून हा सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची चळवळ महाराष्ट्रात पसरली, तेव्हा भिंगारसह तांबट गल्ली, माळीवाडा, डाळ मंडई आणि कापड बाजार परिसरातील व्यापारी व नागरिकांनी एकत्र येत या उत्सवाला सामाजिक व राजकीय जागृतीचे व्यासपीठ बनवले. अहिल्यानगरच्या गणेशोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘सामाजिक सलोखा’ आणि ‘शिस्तबद्ध परंपरा’. शहराच्या ऐतिहासिक पेठांमध्ये गणेशोत्सवादरम्यान सर्व समाजघटक उत्साहाने सहभागी होतात. माळीवाडा परिसरात असलेल्या ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची साडेअकरा फूट उंच व पूर्वाभिमुख, उजव्या सोंडेची भव्य मूर्ती आहे. बाप्पाच्या बेंबीवर फणाधारी नाग आणि शिरावर पारंपरिक पगडी आहे. शहरातील गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीत श्री विशाल गणेशाची पूजा व मान पहिला असतो. शहरातील सर्व शुभकार्यांचा व सामाजिक उपक्रमांचा नारळ याच मंदिरात वाढवला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *