![]()
ढोल-ताशांचा कडकडाट, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि गुलालाची उधळण करत आज मूर्तिजापूर शहर अन् तालुक्यात विघ्नहर्त्याचे सोमवारी अत्यंत दिमाखात आगमन झाले. यंदा तालुक्यात तब्बल २५० सार्वजनिक ठिकाणी गणरायाची स्थापना झाली असून, तब्बल ६२ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’चा पायंडा पाळत सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सजलेले नयनरम्य मंडप, डोळे दीपवणारी रोषणाई, तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे संपूर्ण मूर्तिजापूर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. श्री गणेशाच्या आगमन मिरवणुकांमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गणेशोत्सवाच्या आयोजनात तरुणाईचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. यंदा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात मिळून तब्बल २५० सार्वजनिक ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यात एकट्या मूर्तिजापूर शहरात ११० गणेशमूर्ती विराजमान झाल्या आहेत. विशेष म्हणजे, तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक सलोखा, एकोप्याचा संदेश देणाऱ्या ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील सुमारे १५० गावांपैकी तब्बल ६२ गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात येत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ८५ मंडळांपैकी ३५ गावांत, माना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ५५ मंडळांपैकी २७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवून गावकऱ्यांनी एकोप्याचा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
Source link
मूर्तिजापुरात 250 ठिकाणी श्रीगणेशांची स्थापना:तालुक्यात 246 सार्वजनिक गणरायांची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापणा