Headlines

दुष्काळ घोषित करण्याची मागणी; शेतकऱ्यांची 13 कि.मी. पायी धडक:शिवणगाव-फत्तेपूर ते तिवसा; ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह शेतकरी रस्त्यावर‎




जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांसाठी फत्तेपूर येथून तिवसा तहसील कार्यालयापर्यंत तब्बल १३ कि.मी. पदयात्रा काढत शेतकऱ्यांनी मंगळवार १५ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर धडक दिली. अत्यल्प पाऊस, पिकांचे नुकसान, सिंचनाची उणीव, अपुरा वीजपुरवठा, पीक विम्याचा परतावा वेळेवर न मिळणे, जाचक निकष रद्द करण्याच्या मागणीसह शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याबद्दल विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय देशमुख, प्रहारचे योगेश लोखंडे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढली होती. फत्तेपूर येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत शिवणगाव, फत्तेपूर, वऱ्हा, कुऱ्हा, गुरुकुंज मोझरी, तळेगाव ठाकूर यासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील शेतकरी सहभागी झाले होते. पायी चालत आलेल्या शेतकऱ्यांसोबत ट्रॅक्टर व बैलगाड्यांचाही मोठा ताफा सहभागी झाल्याने पदयात्रेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत यावेळी शासनाचे लक्ष वेधले. तिवसा तालुक्यासह अमरावती जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी, गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेचे पाणी फत्तेपूर-शिवणगाव परिसरातील कोरडवाहू भागात पोहोचवावे, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. या वेळी ‘प्रहार’चे संजय देशमुख, जिल्हाप्रमुख योगेश लोखंडे, सुरेंद्र भिवगडे, बाळा देशमुख, योगेश भुसारी,अंकुश गायकवाड, मोहन आवारे, नीलेश राऊत, पिंटू गाडे, समीर लांडगे,गजू कडू, कपिल उमप, इर्शाद बेग,हेमंत तायडे, शरद खारोडे, यांच्यासह शेकडो प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रसंतांच्या समाधीचे शेतकऱ्यांनी घेतले दर्शन शिवणगाव-फत्तेपूर येथून शेकडो शेतकऱ्यांच्या सहभागाने निघालेली पदयात्रा गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी पोहोचली. यावेळी पदयात्रेतील शेतकऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रा पुढे तिवसा तहसील कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली. तिवसा तहसील कार्यालयावर पोहोचेपर्यंत पदयात्रेत शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि पायी चालत आलेल्या शेतकऱ्यांमुळे पदयात्रेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *