![]()
ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांना पुणे फेस्टिव्हलतर्फे ‘कीर्तन रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बुधवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यावेळी कीर्तन कलानिधी रामचंद्र भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे फेस्टिव्हलचे विश्वस्त मोहन टिल्लू आणि ह. भ. प. निवेदिता मेहेंदळे हेही मंचावर होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. चारुदत्त आफळे म्हणाले की, “मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत; पण 27 वर्षांनंतर पुण्याचा हक्काचा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे.” त्यांनी कीर्तन परंपरेशी युवा पिढीला जोडण्याची गरज व्यक्त केली. डॉ. आफळे म्हणाले, “कीर्तनकारांची योजना आहे की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कीर्तनाचे प्रशिक्षण द्यावे. पुणे फेस्टिव्हलने यासाठी पुढाकार घेतल्यास समाजोपयोगी विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करता येईल.” ते पुढे म्हणाले, “युवा पिढीच्या ऊर्जेला योग्य दिशा दिल्यास त्यातून उत्तम काम उभे राहू शकते. जेन झी पिढीबद्दल फक्त बोलण्याऐवजी त्यांना समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आहे.” रामचंद्र भिडे यांनी पुणे फेस्टिव्हलच्या 38 वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. ते म्हणाले, “डॉ. आफळे यांचे कीर्तनावरील प्रेम, जिद्द आणि देशप्रेम पाहता त्यांची सन्मानासाठी झालेली निवड योग्य आहे.” कीर्तन प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिल्यास भविष्यात पुणे फेस्टिव्हलमध्ये तीन दिवसांचा कीर्तन महोत्सवही आयोजित करता येईल, असेही त्यांनी सुचवले. कृष्णकुमार गोयल म्हणाले, “कीर्तन ही समाजाला शिक्षण आणि संस्कार देणारी प्रभावी कला आहे. पुण्याला अध्यात्म आणि सांस्कृतिक क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे.” ही परंपरा जपण्याचे काम पुणे फेस्टिव्हल करत आहे. दिवंगत नेते सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेला पुणे फेस्टिव्हल आजही अखंडपणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. आफळे यांनी कीर्तनातून इतिहास, संस्कार आणि समाजाला जोडण्याचे काम केले आहे. कीर्तनाशी युवा पिढी जोडली जाणे आवश्यक आहे, असे गोयल यांनी म्हटले. कार्यक्रमाची सुरुवात तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांच्या नांदीने झाली. त्यानंतर ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी श्री गणेश उपासना कीर्तनातून अष्टविनायकांपैकी पाली येथील बल्लाळ गणपतीची कथा सादर केली. त्यांना तबल्याला ओंकार जोशी आणि संवादिनीवर साहिल पुंडलिक यांनी वाद्यसाथ केली.
Source link
ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांना 'कीर्तन रत्न' पुरस्कार:पुणे फेस्टिव्हलतर्फे सन्मानित; युवा पिढीला कीर्तन परंपरेशी जोडण्याची गरज व्यक्त