![]()
कोठारी आयोगाच्या शिफारशीनंतर सुरू झालेल्या बालभारती संस्थेने ६० वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. पुणे फेस्टिव्हलतर्फे बालभारतीच्या ६० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात संचालिका अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. बालभारती १० भाषांमध्ये १० कोटींहून अधिक पाठ्यपुस्तके तयार करते. यंदा संस्थेने एकाच वर्षात चार इयत्तांची पुस्तके प्रकाशित करण्याचे काम केले आहे. आधुनिक माध्यमांचा वापर करून पुस्तकांचे वितरण केले जात आहे. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ६६ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांना सहा पुस्तकांचे संच देण्यात आले आहेत, असे ओक यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासात सहा दशके योगदान देणाऱ्या बालभारती संस्थेच्या ६० वर्षांच्या कामाचा पुणे फेस्टिव्हलने गौरव केला. बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांचा पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई आणि विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते. अनुराधा ओक म्हणाल्या, आज मुलांचा स्क्रीन टाइम वाढत आहे आणि वाचनाची आवड कमी होत आहे. त्यामुळे मुलांना पुन्हा वाचनाकडे वळवणे गरजेचे आहे. ‘किशोर’ मासिक तोट्यात असले तरी ते कमीत कमी दरात मुलांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीसोबतच वाचनसंस्कृती वाढवण्याचे काम करत आहे. बालभारतीची महत्त्वाची जागा जपण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बालभारतीची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली. ही संस्था मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, सिंधी, गुजराती यांसारख्या विविध भाषांमध्ये शालेय पाठ्यपुस्तके तयार करून वितरित करते. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा भाग बनलेल्या या संस्थेचा पुणे फेस्टिव्हलने गौरव केल्याचा आनंद आहे, असे ओक यांनी सांगितले. कृष्णकुमार गोयल म्हणाले की, पुणे फेस्टिव्हल केवळ कला-संस्कृती जपत नाही, तर कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचाही गौरव करतो. बालभारती ही पुणे आणि महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची संस्था आहे.
Source link
बालभारतीच्या 60 वर्षांच्या प्रवासाचा पुणे फेस्टिव्हलकडून गौरव:संचालिका अनुराधा ओक यांचा सत्कार; वाचनसंस्कृती वाढवण्याचे आवाहन