![]()
जिल्हा परिषद प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी मेळघाटातील ‘पेसा’ आणि उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांची भरती केली होती. त्यानंतर आज, गुरुवारी माध्यमिक शिक्षकांचीही भरती प्रक्रिया पार पडली. यात 11 जणांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली. निवड झालेल्या माध्यमिक शिक्षकांची ‘पेसा’ आणि सर्वसाधारण क्षेत्रातील रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही प्रक्रिया झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी स्वतः हजर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, उपशिक्षणाधिकारी किसन फोले आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे उपस्थित होते. कागदपत्र तपासणीनंतर एकूण 11 उमेदवार समुपदेशनासाठी पात्र ठरले होते. यामध्ये ‘पेसा’ क्षेत्रातील इयत्ता 6 ते 8 साठी गणित-विज्ञान विषयाचे 2, भाषा विषयाचे 5 आणि सामाजिकशास्त्र विषयाचे 2 उमेदवार होते. तसेच, सर्वसाधारण क्षेत्रातील सामाजिकशास्त्र विषयाच्या 1 उमेदवाराचा समावेश होता. या 11 उमेदवारांपैकी 1 उमेदवार दिव्यांग असल्याने त्यांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना दिली आहे. संबंधित दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी सक्षम प्राधिकरणाकडून पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या पदस्थापनेचा आदेश काढण्यात येणार आहे. इतर शिक्षकांना मात्र समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजच पदस्थापना देण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विजय कविटकर, वरिष्ठ सहाय्यक सुदर्शन भोसले, विजय राऊत, विजय मालोकार, राहुल काळमेघ आणि विलास मेंदुकर यांनी मदत केली.
Source link
अमरावती जि.प. मध्ये 11 माध्यमिक शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना:प्राथमिक शिक्षकांनंतर आता माध्यमिक शिक्षकांनाही मिळाली नियुक्ती