![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीमध्ये ‘विश्वकर्मा लाभार्थी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. बचतभवन येथे झालेल्या या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रे आणि टूलकिटचे वाटप करण्यात आले. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार प्रवीण तायडे, पीएम विश्वकर्मा समितीचे अध्यक्ष दिलीप आकोटकर, जिल्हा समितीचे सदस्य सोपान गुडधे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, टपाल खात्याचे अधीक्षक पी. ए. गेडाम आणि जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ उपस्थित होते. खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, ही योजना विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारी आहे. त्यांनी प्रत्येक नोंदणीकृत लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवण्याचे आवाहन केले. आमदार प्रवीण तायडे यांनी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे कौतुक केले. तसेच, पहिल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना लगेच दुसरे कर्ज देण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांच्या मार्गदर्शनामुळे अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रशिक्षण, टूलकिट वाटप आणि कर्ज मंजुरी या तिन्ही बाबींमध्ये जिल्ह्याने ही कामगिरी केली आहे, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी सांगितले. या कार्यक्रमात १७ लाभार्थ्यांना कर्जमंजुरीची पत्रे आणि १० लाभार्थ्यांना टूलकिट प्रमाणपत्रे देण्यात आली. पीएम विश्वकर्मा योजनेत जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. जिल्ह्यात २४ हजार लाभार्थींची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २१ हजार लाभार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. १८ हजार लाभार्थींना टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे. बँकांकडून ६ हजार ६४० लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले असून, ५ हजार ४९५ लाभार्थ्यांना ४३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
Source link
अमरावती जिल्हा पीएम विश्वकर्मा योजनेत राज्यात अव्वल:कर्जमंजुरी पत्रे आणि टूलकिट वाटपामुळे मिळाली ही कामगिरी