Headlines

नाना गायकवाडच्या दोन गुन्ह्यांत सरकारची बाजू ॲड. अजय मिसार मांडणार:चतु:शृंगी आणि सांगवी पोलिस ठाण्यातील प्रकरणांत सरकारची बाजू मांडणार.




नानासाहेब शंकरराव गायकवाड यांच्याविरुद्ध दाखल दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये अॅड. अजय सुहास मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने काढलेल्या आदेशानुसार, चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 0777/2023 आणि सांगवी पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 0338/2021 या प्रकरणांमध्ये ते सरकारची बाजू मांडतील. चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील प्रकरण औंध येथील एका इमारतीच्या बनावट भोगवटा प्रमाणपत्राशी संबंधित आहे. महापालिका इमारत निरीक्षक कामिनी सुरेश घोलप यांच्या फिर्यादीनुसार, सर्व्हे क्रमांक 127/1 A ते 1 E, प्लॉट क्रमांक 108 येथील जागेसाठी फक्त तळमजल्यावरील दोन शोरूम आणि स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी होती. पण स्टेट बँक ऑफ इंडियासोबत 15 वर्षांचा भाडेकरार करताना मूळ भोगवटा प्रमाणपत्रात बदल केले. पहिल्या मजल्याच्या वापरासही परवानगी असल्याचे दाखवणारे प्रमाणपत्र सादर केले, असा आरोप आहे. या प्रकरणात गायकवाड, प्रकाश कुलकर्णी आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्याचा वापर यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. सांगवी पोलिस ठाण्यातील 2021 मधील गुन्ह्यात शस्त्र अधिनियम, दरोडा आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमे लावली आहेत. फिर्यादी विठ्ठल शिवानंद गुरव यांच्या जबाबानुसार, त्यांनी गॅरेज व्यवसायासाठी गायकवाड यांच्याकडून 35 लाख रुपये कर्ज घेतले होते. व्याजाची रक्कम थकल्यावर त्यांना धमक्या दिल्या, मारहाण केली. पिस्तूल दाखवून गोळीबार केला, तसेच गॅरेजमधील साहित्य, यंत्रसामग्री आणि गाड्या जबरदस्तीने नेल्या, असा आरोप त्यांनी केला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आता अॅड. मिसार सरकारची बाजू मांडतील. गंभीर फौजदारी प्रकरणांतील त्यांच्या अनुभवामुळे या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *