![]()
मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. देगाव-वाळूज येथील विजयकुमार पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यासमोर मोहोळ तहसील कार्यालयातील सर्कल अधिकारी किसन दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहून त्यांच्या त्याग व शौर्याला उजाळा देण्यात आला. हैदराबाद संस्थानाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील ५८, तर मोहोळ तालुक्यातील १६ गावांचा समावेश होता. निजामशाहीविरुद्ध उभारलेल्या मुक्तिसंग्रामात देगाव येथील स्वातंत्र्यसैनिक जनार्दन यशवंतराव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या समवेत मल्लिकार्जुन निवृत्ती साळुंखे, दत्तात्रय दामोदर पोतदार, मनोहर निवृत्ती नवले, जनार्दन बंडोबा आतकरे, बाबुराव काशिनाथ लामगुंडे आणि विनायक गणपत ढेरे यांनीही या लढ्यात योगदान दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र हैदराबाद संस्थान निजामाच्या अधिपत्याखालीच होते. निजामशाही राजवट आणि रझाकारांच्या दहशतीविरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्राम उभारण्यात आला. या लढ्यात देगाव परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांनी ही सक्रिय सहभाग घेतला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जनार्दन यशवंतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी देगाव येथील वाड्यात तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला होता. तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी याच वाड्यात महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. त्या काळात देगाव-वाळूज हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असून काटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होते. जनार्दन पाटील यांच्याकडे पोलीस पाटील, मुलकी पाटील आणि कुळकर्णी अशा तीन जबाबदाऱ्या होत्या. आंदोलनासंदर्भातील बैठकीनंतर ते प्रशासनाच्या संशयाच्या नजरेत आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद येथील कारागृहात त्यांनी ११ महिन्यांची शिक्षा भोगल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते जगन्नाथ कोल्हाळ, जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, मोहोळ पंचायत समितीच्या उपसभापती उलका पाटील, हनुमंत पोटरे, बाजार समितीचे संचालक गोविंद पाटील आदी उपस्थित होते. देगाव येथील वाड्याचे जतन झाले पाहिजे: साठे देगाव येथील हा ऐतिहासिक वाडा मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाची साक्ष देणारा असून, स्वातंत्र्यसैनिक जनार्दन यशवंतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लढ्याच्या आठवणी या वास्तूशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने या वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन व संवर्धन करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी या ऐतिहासिक स्थळी अधिकृतपणे कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी माजी सरपंच भोयरे बालाजी साठे यांनी केली.
Source link
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आठवणी, त्याग-शौर्याला उजाळा:स्वातंत्र्यसैनिक जनार्दन पाटील यांच्या कार्यावर टाकला प्रकाश