![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत मोठे विधान केले. अजित पवारांच्या अपघाताचे सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे फडणवीस म्हणाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत असून, त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. २३ एप्रिल रोजी अजित पवारांच्या स्मृतीस वंदन करून सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही निवडणूक दादांसाठी स्मृती यज्ञ फडणवीस म्हणाले की, श्रेष्ठ नेते आपल्यातून गेल्यावर निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. शरद पवारांनी फोन करून सुनेत्रा पवारांना पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काँग्रेससह अनेक पक्षांनी उमेदवारी मागे घेऊन राज्याच्या संस्कृतीला साजेसे काम केले. ही निवडणूक केवळ एक निवडणूक नसून, दादांसाठी एक स्मृती यज्ञ आहे, असेही त्यांनी नमूद केले. सुनेत्रा पवारांमध्ये दादांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता अजित पवारांनी बारामतीमध्ये विविध विकासकामे उभी केली, तोच वारसा सुनेत्रा पवार पुढे नेतील. दादांच्या पश्चात त्यांनी स्वतःचे दुःख बाजूला सारून जनतेच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. सुनेत्रा पवारांचा राजकीय अनुभव अलीकडचा असला तरी त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे आणि त्यांनी राजकारण जवळून पाहिले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची कार्यक्षमता मी पाहिली असून, दादांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे फडणवीस म्हणाले. आमचे १५ ते २० वर्ष काम करण्याचे स्वप्न होते अनेक वर्ष दादांसोबत मी काम केले एकत्र आल्यावर पुढील १५ ते २० वर्ष काम करण्याचे स्वप्न आमचे होते. रोखठोक व्यक्तिमत्व दादांचे होते, प्रत्येक कामात त्यांनी आपला जीव ओतला होता. गुणग्राहकता, सर्मपित भावना, जिद्द, कामाचा अभ्यास, दूरदृष्टी हे दादांचे गुण होते. सरकारी काम सर्वात्तम दिसले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. तसेच आर्थिक शिस्त राज्याला लावण्याचे काम त्यांनी केले, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, खासदार पार्थ पवार, खा. शामराव वडकुते, धनंजय मुंडे, जय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री व्यासपीठावर येण्यापूर्वी त्यांनी शारदा विद्यामंदिरच्या प्रांगणातील मैदानावर अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. खासदार सुप्रिया सुळे देखील व्यासपीठावर येऊन नंतर सभास्थळावरून रवाना झाल्या.
Source link
अजित पवारांच्या अपघाताचे सत्य बाहेर आणणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत विधान