![]()
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 178 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून या या निधीतून होणाऱ्या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे.यामुळे या पवित्र परिसराचा कायापालट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही दिवसातच या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे औंढा नागनाथ येथे दरवर्षी येणाऱ्या 50 लाखापेक्षा अधिक भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत या विकास आराखड्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार आता या कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या विकास आराखड्याअंतर्गत औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धनासह परिसरातील विविध ऐतिहासिक वास्तू, नंदी मंडप, ओवरी, दर्शन बारी आणि विविध प्राचीन मंदिरांचे जतन व जीर्णोद्धार करण्याचे मोठे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचा विकास देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे. मंदिराच्या मूळ वास्तुकलेचे पावित्र्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाच्या तसेच बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे केली जाणार आहेत. या आराखड्यामध्ये केवळ मंदिर संवर्धनच नव्हे, तर भाविकांसाठी आधुनिक सुविधांची निर्मिती करण्यावरही मोठा भर देण्यात आला आहे. भाविकांना दर्जेदार आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी विविध विकास कामे युद्धपातळीवर केली जाणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. सर्व कामे निश्चित कालमर्यादेत आणि उच्च गुणवत्तेने पूर्ण करण्याची जबाबदारी या यंत्रणांवर राहणार असून, सन 2026-27 पासून या कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. श्री क्षेत्र औंढा नागनाथ विकास आराखड्याच्या टप्पा-दोन अंतर्गत मंजुरी मिळालेल्या प्रमुख कामांमध्ये पुरातत्व विभागाकडील संवर्धन आणि जीर्णोद्धार कामे मंदिराच्या आवारातील वास्तूंच्या संवर्धनांतर्गत नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारीचे काम केले जाईल. हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांच्या संवर्धन कामांमध्ये हरीहर तलाव, कालिका माता मंदिर, दक्षिण व पश्चिम दिशेची महादेव मंदिरे, गणपती मंदिर, हनुमान मंदिर, उत्तर दिशेची महादेव मंदिर, मंदिराचा चौथरा, श्री निळकंठेश्वर मंदिर, श्री विसोबा खेचर स्वामी मंदिर आणि चिंतामणी मंदिराचा विकास समाविष्ट आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मुख्य कामांमध्ये प्रवेशद्वार आणि सुरक्षा केबिन, प्रवेशद्वार व पोलिस-इन्फॉर्मेशन बूथ, सामानघर व दर्शनरांग- कार्यालय-पास केंद्र-प्रसाधनगृहांचा समावेश असलेला दर्शन मंडप, खानपान केंद्र, बाह्य मार्गाजवळील प्रसाधनगृह, पूजा साहित्य व इतर वस्तूंच्या दुकानांची उभारणी केली जाईल. तसेच उत्तरकडील व्हीआयपी दर्शनबारी, भजन मंडप, सुरक्षा भिंत आणि परिसर सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
Source link
श्रीक्षेत्र औंढा नागनाथ विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्रशासकीय मान्यता:178 कोटींचा निधी मंजूर, 50 लाखापेक्षा अधिक भाविकांची होणार सोय