![]()
उदगीर येथील सीए श्याम कलानी यांनी २१४३ कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने परदेशात पाठवल्याचे उघडकीस आल्यानंतर आता आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील ५ सीए आणि ३९ बोगस कंपन्यांनी मिळून ७,३८० कोटी रुपये चीन, अमेरिका, ब्रिटन, बँकॉक आणि सिंगापूरला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयकर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक आयकर निदेशक प्रतीक नंदकिशोर मंत्री यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. सीए रवी धनपतसिंग चौधरी, अभिषेक अरविंद कुलकर्णी, सीताराम महाबलेश्वर भट, नलीन रतिलाल पांचाळ आणि गणेश अरुण पाटणे यांच्यासह संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांनी कागदपत्रे, खातेवही व प्रत्यक्ष व्यवहारांची पडताळणी न करताच परदेशात निधी पाठवण्यासाठी आवश्यक असणारी फॉर्म १५सीबी प्रमाणपत्रे तयार केली. तपासात असे निष्पन्न झाले की, नमूद केलेल्या पत्त्यावर ‘ट्रान्सीटलाइन शिपिंग एजन्सीस प्रा. लि.’, ‘रिव्हुलेशन मारीटाइम प्रा. लि.’ आणि ‘एव्हरलाइट शिपिंग प्रा. लि.’ या कंपन्या आढळून आल्याच नाहीत. अत्यंत कमी उत्पन्न दाखवूनही या शेल कंपन्यांनी बनावट ‘बिल ऑफ लँडिंग’च्या आधारे मोठ्या प्रमाणात परदेशी निधी पाठवला. ८ हजारांहून जास्त प्रमाणपत्रे, शेल कंपन्यांना पाठवले पैसे सीए गणेश अरुण पाटणे यांनी २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत तीन कंपन्यांसाठी ६ हजार ७ प्रमाणपत्रांद्वारे ४ हजार ८०४ कोटी ५४ लाख, तर २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीत सीए रवी चौधरी यांनी ९ कंपन्यांसाठी ६१८ प्रमाणपत्रांद्वारे ८२१ कोटी ३५ लाख, सीए अभिषेक कुलकर्णी यांनी १८ कंपन्या/व्यक्तींसाठी ४०८ प्रमाणपत्रांद्वारे ४३१ कोटी ३७ लाख, सीए सीताराम भट यांनी ८ कंपन्यांसाठी १६३ प्रमाणपत्रांद्वारे २०० कोटी ५८ लाख, तर सीए नलीन पांचाळ यांनी नऊ कंपन्यांसाठी ७९१ प्रमाणपत्रांद्वारे १,१२२ कोटी ५३ लाख रुपयांचे व्यवहार केल्याचे पोलिसांनी सांगितले. टॅक्स क्लिअरन्ससाठी फॉर्म १५सीबी फॉर्म १५सीबी हे सीएकडून मिळणारे एक टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट असते. याद्वारे परदेशात पाठवला जाणारा पैसा कायदेशीर असून त्यावर कर भरलेला आहे याची हमी दिली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सीएने जारी केलेला फॉर्म १५सीबी आणि करदात्याने भरलेला फॉर्म १५सीए असल्याशिवाय बँका पैसे परदेशात पाठवत नाहीत. इनसाइड स्टोरी: ओळखीच्या व्यक्तींमार्फत मिळवले काम चौकशीत सीए गणेश पाटणे यांनी चुका मान्य केल्या आहेत. त्यांचे परिचित अमोल पाटकर यांनी सॅमसन कार्लोस फर्नांडिस, श्रीनिवास राव, सुनील सिंग, प्रसाद सावंत आणि संतोष जैस्वाल यांच्याशी त्यांची ओळख करून दिली होती. त्यानंतर शेल कंपन्यांसाठी फॉर्म १५सीबीचे काम करण्याचे ठरले. एक्स्पर्ट-ध्रुव पांडेय, सीए, भोपाळ: आयसीएआय दोषी सीएंवर कारवाई करू शकते फॉर्म १५सीबी जारी करताना सीएने पैशांच्या व्यवहाराचे स्वरूप, भारतातील करपात्रता, लागू कर कपातीचा दर आणि २ देशांमधील कर कराराचा फायदा यांची पडताळणी केली पाहिजे. जर सनदी लेखापाल किंवा संबंधित पक्षाच्या बाजूने कोणताही फसवणुकीचा अथवा कपटपूर्ण उद्देश आढळून आला तर तथ्ये आणि लागू कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर व गुन्हेगारी कारवाई केली जाऊ शकते. भारतीय सनदी लेखापाल संस्था (आयसीएआय) सुद्धा दखल घेऊन संबंधित सीएवर शिस्तभंगाची कारवाई करू शकते.
Source link
सीएंचा देशातील सर्वात मोठा गैरव्यवहार, उदगीरनंतर मुंबईत घोटाळा:39 बोगस कंपन्यांद्वारे 7380 कोटी परदेशात; मुंबईतील 5 सीएंवर गुन्हा