Headlines

श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न:बालेवाडीत घडली घटना, मोटार चालकासह दोघांना अटक




पुण्यातील बालेवाडी भागात श्वान मालक महिलेवर मोटार घालून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. मोटारीजवळ श्वान आल्याने झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी मोटार चालकासह दोघांना अटक केली आहे. मनीषा संजय भंडारी (वय 46, रा. पार्क एक्सप्रेस सोसायटी, बालेवाडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मोटार चालक दिनेश दशरथ बिरादार (वय 23) आणि प्रशांत नवनाथ भोंडवे (वय 25, दोघेही रा. बालेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. भंडारी यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. बालेवाडीतील दसरा चौकाजवळ आरोपी बिरादार आणि भोंडवे हे मोटार घेऊन थांबले होते. श्वान मोटारीजवळून गेले असता, आरोपींनी श्वान चावते का, अशी विचारणा केली. भंडारी यांनी श्वान चावत नसल्याचे सांगितले. भंडारी यांनी मोटारीत डोकावून पाहिले असता, एक जण दारू पीत असल्याचे दिसले. ही दारू पिण्याची जागा नाही, असे सांगून भंडारी श्वानाला घेऊन तेथून निघून गेल्या. त्यानंतर त्या बालेवाडीतील दसरा चौकाजवळ असलेल्या मैदानात गेल्या. तिथे मोटार चालक आणि त्याचा साथीदार मोठ्या आवाजात गाणी लावून आले. भंडारी काही अंतरावर एका इमारतीबाहेर थांबल्या होत्या. तेव्हा मोटार चालक आणि साथीदार तिथे आले. दोघांनी महिलेला शिवीगाळ केली आणि अचानक मोटार मागे घेऊन तिच्या अंगावर घातली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, वाघोली परिसरात श्वान भुंकल्याने दोन महिलांना गजाने मारहाण करण्यात आल्याची आणखी एक घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री रामचंद्र चव्हाण (वय 27, रा. वाघमारे वस्ती, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ताराचंद काळूराम चव्हाण आणि हिरामण काळूराम वाघमारे (दोघे रा. वाघमारे वस्ती, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चव्हाण यांनी पाळलेले श्वान आरोपींवर भुंकले होते. त्यावेळी एका आरोपीने श्वानाच्या अंगावर दुचाकी घातली. या कारणावरून चव्हाण यांनी आरोपींना जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी चव्हाण आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ करून गजाने मारहाण केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *