![]()
“समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची खरी अभिव्यक्ती आहे. मात्र, सध्या जगभरात द्वेष आणि उन्मादातून जी हिंसा पसरत आहे, ती केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे तर जागतिक अध्यात्मिकतेचा विनाश घडवीत आहे,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित वर्ष २०२५-२६ चे ‘बा, बापू, विनोबा’ आणि ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुरेश पठारे, अरविंद पारगावकर आदी उपस्थित होते. स्वधर्माचा शोध वंचितांच्या सेवेतडॉ. बंग यांनी यावेळी ‘स्वधर्म आणि ईश्वराचा शोध’ या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “वंचितांची सेवा करतानाच आपल्याला स्वतःचा आणि ईश्वराचा शोध लागतो. केवळ सरकारी यंत्रणा किंवा आर्थिक खैरात वाटून समाजात स्थायी बदल घडत नाही. गांधी, विनोबा आणि कस्तुरबा यांनी दिलेला अहिंसक संवादाचा मार्गच आज देशाला आणि विश्वाला वाचवू शकतो. माजी मंत्री थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील संतांची आणि समाजसुधारकांची क्रांतिकारी परंपरा स्नेहालयाने गेल्या चार दशकांपासून निष्ठेने जपली आहे. लैंगिक शोषित महिला, अनाथ मुले आणि पर्यावरणासारख्या मूलभूत प्रश्नांना या संस्थेने रचनात्मक उत्तरे दिली आहेत. प्रास्ताविकात संस्थेच्या सचिव डॉ. प्रीती भोम्बे यांनी सांगितले की, १९९५ पासून स्नेहालयने ६०० हून अधिक संस्थांना अशा पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले आहे. केवळ पुरस्कारच नव्हे, तर या संस्थांना देणगीदार आणि संसाधने जोडून देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ३०० हून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने हा सोहळा प्रेरणादायी ठरला.सूत्रसंचालन स्वाती रानडे यांनी, तर आभार अध्यक्षा जयाताई जोगदंड यांनी केले. “सेवाप्रेरणेचा गौरव : पुरस्कारांचे मानकरी {‘बा’ (कस्तुरबा) पुरस्कार :शबाना मामुन अख्तर (बंगाल) { ‘बापू’ (गांधी) पुरस्कार : भक्ती व संदीप परब (कोकण) { ‘विनोबा’ पुरस्कार : कावेरी व दीपक नागरगोजे (बीड) { आदर्श शिक्षक पुरस्कार : दत्तात्रय वारे, सचिन वाघ, चंद्रकला कराळे
Source link
स्नेहालयतर्फे ‘बा, बापू, विनोबा’ पुरस्कार प्रदान:द्वेष अन् उन्मादातून होणारी हिंसा भारतीय संस्कृतीचा विनाश घडवेल- डॉ. अभय बंग