![]()
गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांचे दागिने चोरट्यांनी चोरले आहेत. पुणे शहरात अशा चार घटना घडल्या असून, या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दोन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्यात आले. कोथरूड भागातील एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवारवाड्याजवळ तात्पुरती दुकाने लावण्यात आली होती. तक्रारदार महिला या खरेदी करत असताना, गर्दीचा फायदा घेऊन तिच्या गळ्यातील ३८ हजार रुपयांचे दागिने चोरण्यात आले. याच परिसरात आणखी एका महिलेचे दागिनेही चोरले गेले. पोलीस हवालदार राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या उत्सव मंडपाजवळ या एका महिलेचे ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरले गेले. खडकी भागात राहणाऱ्या या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले या घटनेचा तपास करत आहेत. तर हुतात्मा बाबू गेणू मंडळाच्या उत्सव मंडपाजवळ एका महिलेचे १२ हजार रुपयांचे दागिने चोरण्यात आले. या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, हवालदार अहिरे तपास करत आहेत. याच परिसरात चोरट्यांनी नांदेडच्या एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे दागिनेही चोरले. ही महिला गणरायाच्या दर्शनासाठी आली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांनी आता विशेष लक्ष ठेवणे सुरू केले आहे.
Source link
गणेशोत्सवात महिलांचे दागिने चोरट्यांकडून लंपास:पुण्यात चार घटना, फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल