Headlines

विधानपरिषद निवडणूक:27 ला कळणार एकूण मतदार;‘नोटा’ आणि खर्चमर्यादा नाही




अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघात २६ सप्टेबरपर्यंत मतदार नोंदणीस मुभा दिली असून, या तारखेपर्यंत नोंद झालेल्या पात्र मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतील मतदारसंख्या रविवारी २७ सप्टेबरला स्पष्ट होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी बुधवारी २३ सप्टेंबरला स्पष्ट केले. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर नयना गुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या मतदारांची संख्या स्पष्ट झाली की त्यानुषंगाने मतदान केंद्रांची संख्या व यादीही घोषित केली जाईल. गतवेळी या निवडणुकीत ३५, ६२२ मतदार होते. त्यावेळी ७७ मतदान केंद्र होते. त्यामुळे या वेळी किती मतदार असतील त्यानुसार मतदान केंद्र निश्चित होतील. मतदाराला १६ कि.मी.पेक्षा लांब जावे लागू नये, हा निकष असल्याने मतदाराच्या ठिकाणापासून १६ कि.मी.तच मतदान केंद्र राहणार आहे. या निवडणुकीत ‘इव्हीएम’चा वापर होत नाही. मतपत्रिकेवर ‘नोटा’ चा पर्यायही नसतो. उमेदवाराने निवडणूक खर्च किती करावा, याला मर्यादा घातली नाही. एका मतदान केंद्रावर किती मतदार असावेत, याच्या उत्तरात किमान ३० मतदारांसाठी एक मतदान केंद्र असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु कमाल मर्यादा किती असेल, याची आयोगाने स्पष्टता केली नसल्याचे सांगितले. पाचही जिल्ह्यांतील ५६ तहसीलदार, २७ एसडीओ, काही उपजिल्हाधिकारी पाचही जिल्हाधिकारी या निवडणुकीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर काम करतील असे सांगून अपर आयुक्त संजय जाधव हे सहायक निवडणूक अधिकारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार खुल्या संवर्गातील असल्यास १० हजार, राखीव संवर्गातील उमेदवार असल्यास त्यांना ५ हजार अनामत रक्कम भरावी लागणार आहे. म्हणून २६ सप्टेंबर ही मतदार नोंदणीची शेवटची तारीख उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार म्हणून नोंद होणाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला जातो. त्यानुसार २६ सप्टेबर ही तारीख मतदार नोंदणीचा अखेरचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *