Headlines

भेसळखोरांना पाठीशी घालणे अंगलट:सिन्नरमधील 17 लाखांच्या दूध पावडरप्रकरणी FDAच्या दोन बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कुऱ्हाड, तुकाराम मुंढे घेणार अंतिम निर्णय




अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून धडक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला राज्यभरात एफडीएकडून धडक कारवाया सुरू असतानाच, दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील 17 लाख रुपयांच्या संशयास्पद दूध पावडर साठा प्रकरणात भेसळखोरांवर ठोस कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांवरच आता शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. या चौकशी अहवालामुळे एफडीएच्या अंतर्गत वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आता या दोन्ही अधिकाऱ्यांवर आयुक्त तुकाराम मुंढे काय कारवाईचा बडगा उगारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, रवा, मैदा आणि खाद्यतेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा गैरफायदा घेऊन नफेखोर भेसळयुक्त अन्नपदार्थ बाजारात आणण्याचा प्रयत्न करतात. हे रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. नाशिक विभागातही एफडीएने जोरदार धडक मोहीम हाती घेतली असून, विभागातील चार जिल्ह्यांमध्ये अवघ्या 10 दिवसांत तब्बल 36 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 5 कोटी 40 लाख 16 हजार 621 रुपयांचा संशयास्पद व भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला. या धडक कामगिरीचे नागरिकांमधून मोठे कौतुक होत असतानाच, दुसरीकडे सिन्नरमधील एका कारवाईत खात्यातीलच अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत उघडकीस आला आहे. नेमके काय आहे 17 लाखांच्या दूध पावडरचे प्रकरण? जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी येथे एका संशयास्पद गोदामावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात तब्बल 17 लाख रुपये किमतीचा दूध पावडरचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला होता. प्राथमिक पाहणीत या पावडरमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील संशयित आरोपी हेमंत पवार याच्यावर यापूर्वीही दूध भेसळीचे गंभीर गुन्हे दाखल होते. अशी पार्श्वभूमी असतानाही संबंधित तपास अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई न करता जाणीवपूर्वक मवाळ भूमिका घेतली आणि ठोस कारवाई करणे टाळले. अधिकाऱ्यांच्या या संशयास्पद भूमिकेविरोधात तक्रारदार भाऊसाहेब बैरागी यांनी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंधातून किंवा संगनमताने भेसळखोराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. चौकशीत दोष सिद्ध; कर्तव्यात हेतुपुरस्सर टाळाटाळ तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एम. यू. माने यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी सोपवण्यात आली होती. एफडीएचे सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली. माने यांच्या चौकशी अहवालात अत्यंत गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. संशयितावर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट अधिकार आणि पुरावे असतानाही या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपले विहित कायदेशीर कर्तव्य बजावण्यात हेतुपुरस्सर (जाणीवपूर्वक) दुर्लक्ष व टाळाटाळ केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. अहवाल सादर; तुकाराम मुंढे घेणार अंतिम फैसला नाशिक विभागाच्या सहआयुक्तांनी सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची स्पष्ट शिफारस करणारा गोपनीय अहवाल मुंबई येथे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सादर केला आहे. आपल्या कडक शिस्तीसाठी आणि भ्रष्ट प्रवृत्तींवर तात्काळ प्रहार करण्यासाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे आता स्वतःच्याच विभागातील या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करतात की थेट खातेनिहाय चौकशी लावून सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश देतात, यावर अंतिम फैसला लवकरच होणार आहे. या कारवाईच्या इशाऱ्यामुळे भेसळखोरांशी संधान साधणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ———————— हेही वाचा… फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर: कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार अन् 2016-17 मधील वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडाने उभी पिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा थेट बांधावर उतरले आहेत. काल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर, मुख्यमंत्री आज विदर्भातील अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *