“लोकांमधील प्रभाव आणि लोकप्रियता हे कायद्यापासून वाचण्याचे कोणतेही संरक्षक कवच (इम्युनिटी) ठरू शकत नाही. इतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच चित्रपट कलाकारांनीही कायद्याचा आदर केलाच पाहिजे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्
.
गुजरातमधील एकतानगर येथे आयोजित 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिनेकलाकारांना हानिकारक उत्पादनांचा प्रचार न करण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. राष्ट्रपतींच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम भरला आहे.
जो प्रकाश पसरवतो, तोच खरा स्टार; राष्ट्रपतींचे सिनेकलाकारांना आवाहन
22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील एकता नगर (केवडिया) येथे देशातील मानाच्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण पार पडले. या सोहळ्यात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपट विश्वाला आरसा दाखवणारी भूमिका मांडली. “प्रसिद्ध कलाकारांमध्ये देशभरातील कोट्यवधी नागरिकांवर, विशेषतः नव्या पिढीवर आणि तरुणाईवर प्रभाव टाकण्याची मोठी ताकद असते. कलाकारांनी दिलेल्या संदेशांचे समाजात अंधानुकरण होते.”
“जेव्हा कलाकार शिस्तबद्ध जीवनशैली आणि आरोग्याबाबत बोलतात, तेव्हा लाखो तरुण त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. त्यामुळे कलाकारांनी स्वतः आरोग्यास हानिकारक असलेल्या गोष्टींचे सेवन करू नये आणि अशा उत्पादनांची जाहिरात किंवा प्रचारही करू नये. जो समाजात प्रकाश पसरवतो तोच खरा स्टार असतो; अंधार पसरवणारा किंवा समाजाला चुकीच्या मार्गावर नेणारा कधीही खरा स्टार होऊ शकत नाही,” अशा शब्दांत राष्ट्रपतींनी सिनेसृष्टीला अंतर्मुख करणारा संदेश दिला.
प्रभावासोबत जबाबदारीही येते- तुकाराम मुंढे
राष्ट्रपतींच्या आवाहनाचा व्हिडिओ अधिकृतरीत्या शेअर करत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींना त्यांची सामाजिक व कायदेशीर कर्तव्ये स्पष्टपणे अधोरेखित केली. “हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा जाहीरपणे उपस्थित केल्याबद्दल मी माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मनापासून आभारी आहे.”
“विविध उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या तथाकथित सेलिब्रिटींचा जनतेवर मोठा प्रभाव असतो. हा प्रभाव म्हणजे एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. आपण आपल्या लोकप्रियतेचा वापर कायद्यापासून वाचण्यासाठी ‘इम्युनिटी’ (संरक्षक कवच) म्हणून करणार आहोत की जबाबदारी म्हणून, हे या कलाकारांनी ठरवले पाहिजे.”
“जर एखादे उत्पादन आरोग्याला घातक असेल, तर केवळ पैशांसाठी त्याचे समर्थन करणे चुकीचे आहे. लोकप्रियता कितीही मोठी असली तरी कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. खाद्यपदार्थ किंवा पेयांच्या माध्यमातून आरोग्याला धोका निर्माण होत असेल, तर महाराष्ट्र एफडीए अशा गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही.”
शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला यापूर्वीच नोटीस
तुकाराम मुंढे यांचा हा इशारा अशा पार्श्वभूमीवर आला आहे, जेव्हा महाराष्ट्र एफडीएने बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएने 11 ऑगस्ट रोजी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी अधिकृत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ही जाहिरात म्हणजे प्रत्यक्षात आरोग्यास घातक असणाऱ्या गुटखा आणि तंबाखूजन्य पान मसाल्याचे छुप्या पद्धतीने केलेले प्रमोशन (Surrogate Advertising) असल्याचा स्पष्ट ठपका एफडीएने ठेवला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम 24 (दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी) आणि कलम ५३ (दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी दंडात्मक तरतूद) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींच्या थेट आवाहनानंतर आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे कोट्यवधी रुपयांची कंत्राटे घेऊन आरोग्यास घातक असणाऱ्या उत्पादनांचे सरोगेट प्रमोशन करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
————————
हेही वाचा…
भेसळखोरांना पाठीशी घालणे अंगलट:सिन्नरमधील 17 लाखांच्या दूध पावडरप्रकरणी FDAच्या दोन बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कुऱ्हाड, तुकाराम मुंढे घेणार अंतिम निर्णय

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून धडक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला राज्यभरात एफडीएकडून धडक कारवाया सुरू असतानाच, दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील 17 लाख रुपयांच्या संशयास्पद दूध पावडर साठा प्रकरणात भेसळखोरांवर ठोस कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांवरच आता शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. या चौकशी अहवालामुळे एफडीएच्या अंतर्गत वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आता या दोन्ही अधिकाऱ्यांवर आयुक्त तुकाराम मुंढे काय कारवाईचा बडगा उगारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी