![]()
राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या या दौऱ्याला थेट ‘इव्हेंटबाजी’ ठरवत सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांना भेटताना लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर आणि टेबलावर करपलेली पिके ठेवून केलेल्या फोटोसेशनवरून वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून, हा दौरा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा निर्लज्जपणा असल्याचे ते म्हणाले. ‘दुःख विकणे हा बळीराजाचा अपमान’ विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सरकारवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “दुष्काळ पाहणीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांची नुसती इव्हेंटबाजी सुरू आहे. मुख्यमंत्री दुष्काळ पाहणीसाठी गेले होते का अन्नदात्याच्या संकटाचे प्रदर्शन मांडण्यासाठी? टेबलावर जळालेली पिके ठेवून फोटोसेशन करताना सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुष्काळ पाहणीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे दुःख विकणे, हा महाराष्ट्राच्या मातीचा आणि बळीराजाचा अपमान असल्याचे ते म्हणाले. मेटल डिटेक्टरवरून सरकारला धारेवर धरले शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव उभारण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरवरून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष्य केले. “ज्या शेतकऱ्यांच्या घामावर आणि मतांवर तुम्ही सत्ता भोगता, त्याच शेतकऱ्यांना भेटायला येताना मेटल डिटेक्टरच्या चौकटी उभ्या केल्या जातात. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला गुन्हेगारासारखे तपासणारा आणि स्वतःच्याच जनतेला घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिला नव्हता,” असा घणाघात त्यांनी केला. ‘देखावा नको, थेट मदत द्या’ हा पाहणी दौरा नसून कोरड्या आश्वासनांचा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आता कॅमेऱ्यापुढील देखावा आणि तुमची कोरडी आश्वासने नको आहेत. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी,” अशी आक्रमक मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ .. हेही वाचा.. दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त:काजू-बदाम प्रकरणानंतर पुन्हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप पिकांवर परिणाम होत असून, दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध स्तरांवर आढावा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, अशाच एका बैठकीत काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दृश्य समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सविस्तर वाचा
Source link
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निर्लज्जपणा!:मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका, म्हणाले- देखावा नको, थेट मदत द्या