![]()
पुण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नावाने दंडाचे बनावट चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची तीन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तक्रारदार मंगळवार पेठेत राहतात. सायबर चोरट्यांनी एका अनोळखी मोबाइल नंबरवरून तक्रारदाराला आरटीओच्या नावाने दंडाचे बनावट चलन पाठवले. हे चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. तक्रारदाराचा मोबाइल नंबर बँक खात्याला जोडलेला आहे. संबंधित फाईल उघडताच चोरट्यांनी तक्रारदाराचा मोबाइल नंबर हॅक केला. त्यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून तीन लाख चार हजार रुपये काढून घेतले. ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या एका खात्यात जमा करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एन. मुळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे महापालिकेच्या व्यायाम शाळेत चोरी दुसऱ्या एका घटनेत, पुणे महापालिकेच्या व्यायाम शाळेतून चोरट्यांनी आठ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाची व्यायाम शाळा विश्रांतवाडी परिसरात आहे. याच परिसरात महापालिकेचा नानासाहेब परुळेकर जलतरण तलाव आहे. त्याच्या आवारात ही व्यायाम शाळा आहे. चोरट्यांनी व्यायाम शाळेच्या तुटलेल्या खिडकीतून आत प्रवेश केला. व्यायाम शाळेतून साडेआठ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचे उघड झाल्यावर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस. कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
आरटीओच्या नावाने बनावट चलन पाठवून फसवणूक:सायबर चोरट्यांकडून एका व्यक्तीला 3 लाख रुपयांचा गंडा