![]()
“शांत राहणे हे एका विशिष्ट काळापर्यंत ठीक असते; परंतु तो मुळात माझा मूळ स्वभाव नाही. माझा स्वभाव संघर्ष करण्याचा आणि जशास तसे उत्तर देण्याचा आहे. माझ्याविरोधात कसलाही संबंध नसताना सलग 252 दिवस मीडिया ट्रायल झाली, तेव्हा मी शांत राहिलो. स्वभावाविरुद्ध जाऊन शांत बसल्यामुळे त्याचा माझ्या शरीरावर आणि प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. त्या वेळी मी शांत न राहता व्यक्त व्हायला हवे होते, ते माझ्याकडून चुकले,” अशी अत्यंत प्रांजळ कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, बळीराजावरील दुष्काळाचे संकट, बिघडलेला सामाजिक सलोखा, स्वतःचा आजारपण आणि फिटनेस, मीडिया ट्रायलचा काळ आणि भविष्यातील आक्रमक राजकीय भूमिकेबाबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. शेतकऱ्यांचे संकट दूर होवो आणि सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्थापित व्हावा विघ्नहर्त्या गणरायाकडे मागितलेल्या साकड्याबाबत विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले, “आज महाराष्ट्रातील बळीराजावर पावसाने ओढ दिल्याने गंभीर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या झळा सोसणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांचे संकट विघ्नहर्त्याने दूर करावे आणि त्यांना या संकटाचा सामना करण्याची प्रचंड ताकद द्यावी, हीच पहिली प्रार्थना मी बाप्पाच्या चरणी केली.” “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात १८ पगड जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणून एकात्मतेचा गावगाडा निर्माण केला होता. शतकानुशतके हा समाज गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होता. मात्र, दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील हा सामाजिक सलोखा पूर्णपणे मोडला गेला आहे. महाराष्ट्राची ही बिघडलेली सामाजिक वीण पुन्हा घट्ट व्हावी आणि समाजात पूर्वीसारखे बंधुभाव व ऐक्य निर्माण व्हावे, हे दुसरे साकडे मी गणरायाला घातले आहे.” स्वतःसाठी काही मागितले नाही; अडीअडचणीत सोबत राहिलेल्यांचे ऋण स्वतःसाठी काही मागितले का, यावर भावुक होत मुंडे म्हणाले, “मी वैयक्तिक आयुष्यासाठी बाप्पाकडे काहीही मागितलेले नाही. आज माझ्या पाठीशी असे असंख्य कार्यकर्ते आणि सामान्य जनता उभी आहे, ज्यांना मी कधी प्रत्यक्ष पाहिलेही नाही; मात्र माझ्या अत्यंत वाईट काळात ते माझ्यासोबत सावलीसारखे खंबीरपणे उभे राहिले. ते कदाचित माझ्यासाठी प्रार्थना करत असतील. त्यामुळे मी जे काही मागतो ते शेतकरी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या कल्याणासाठीच मागतो.” जिममधील व्हायरल व्हिडिओवर म्हणाले, “मसल पॉवर नव्हे, फिटनेसची प्रेरणा” काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या त्यांच्या वर्कआऊट आणि जिमच्या व्हिडिओबाबत बोलताना ते म्हणाले, “राजकारणात ‘मसल पॉवर’ म्हटले की लगेच वेगळा अर्थ लावला जातो. परंतु मला लहानपणापासूनच व्यायामाची भारी आवड आहे. मधल्या काळात मी अनेक आजारांचा सामना केला आणि त्यातून पूर्णपणे बरा होऊन बाहेर पडलो आहे.” “पूर्वीपासून नियमित व्यायाम केल्याने शरीराची ‘मसल मेमरी’ त्वरित सक्रिय होते. मी मेहनत घेत असल्याचे आणि प्रकृतीत सकारात्मक सुधारणा झाल्याचे पाहून ट्रेनर आणि सहकाऱ्यांनी आग्रह धरला की, हे पाहून इतर अनेक लोकांना व्यायाम करण्याची प्रेरणा मिळेल. केवळ आरोग्याची आणि व्यायामाची प्रेरणा मिळावी म्हणूनच तो व्हिडिओ शेअर केला होता, त्यामागे कोणतीही राजकीय मसल पॉवर दाखवण्याचा उद्देश नव्हता.” 252 दिवसांची मीडिया ट्रायल आणि शांत राहण्याची चूक गेल्या दीड-दोन वर्षांतील वाद आणि त्यावरील मौनाबाबत त्यांनी आत्मपरीक्षण केले, “माझा कोणताही संबंध नसताना 252 दिवस सलग माझ्याविरोधात प्रसारमाध्यमांतून मोहीम चालवली गेली. त्यावेळी मला शांत राहण्याचा आणि न बोलण्याचा सल्ला देण्यात आला. प्रत्यक्षात माझा स्वभाव संघर्ष करण्याचा आणि अन्यायाला सडेतोड उत्तर देण्याचा आहे. पण स्वभावाच्या विरोधात जाऊन मी गप्प राहिलो, ज्यामुळे माझ्या शरीरावर कमालीचा ताण आला आणि त्याचा फटका प्रकृतीला बसला. तेव्हाच स्पष्टपणे समोर येऊन बोलायला हवे होते, असे मला आज प्रामाणिकपणे वाटते.” आता गप्प बसणार नाही यापुढे तुम्ही शांत राहणार नाही का, असा थेट प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत स्पष्ट केले, “शांत राहायचे तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच शांत राहता येते. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि मी योग्य वेळेची प्रतीक्षा करत होतो. एका मर्यादेपर्यंत शांत राहणे ठीक आहे, पण तो माझा पिंड नाही. येणाऱ्या काळात मी पुढे शांत राहणार आहे की स्वतः मैदानात उतरून व्यक्त होणार आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला लवकरच दिसून येईल,” असा थेट व सूचक इशारा देत त्यांनी आगामी काळात आक्रमक राजकीय इनिंग खेळण्याचे स्पष्ट संकेत दिले. ————————— हेही वाचा… निवडणूक आयोगाकडून ‘मॅच फिक्सिंग’!: राज ठाकरेंचा हल्लाबोल, ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही’ ‘इंडियन एक्स्प्रेस’ने निवडणूक आयोगातील (ECI) अंतर्गत वादाबाबत केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. गेल्या १० महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी १४ वेळा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आक्षेप नोंदवल्याचा अहवाल समोर आल्यानंतर, राज यांनी निवडणूक आयोगावर थेट ‘मॅच फिक्सिंग’चा गंभीर आरोप केला आहे. तसेच, मनमानी कारभार करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आणि त्यांना हाताशी धरून सत्तेत आलेल्या सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
252 दिवसांच्या मीडिया ट्रायलवर गप्प बसलो ही चूक होती!:शांत राहणे माझा स्वभाव नाही, आता गप्प बसणार नाही; धनंजय मुंडे मोकळेपणाने व्यक्त