Headlines

संभवामि युगे युगे नृत्यनाट्याला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद:पुणे फेस्टिव्हलमध्ये संस्कृती बालगुडे यांच्या संकल्पनेतून साकारले श्रीकृष्ण चरित्र




श्रीकृष्ण चरित्रातील विविध प्रसंगांचे दर्शन घडवणारे ‘संभवामि युगे युगे’ हे नृत्यनाट्य बुधवारी पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर झाले. या प्रत्ययकारी प्रयोगाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला. पूर्णपुरुष मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाच्या अवतारकार्याचे महत्त्व यातून पुन्हा एकदा दिसून आले. संस्कृती बालगुडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि त्यांनीच दिग्दर्शित व अभिनित केलेले हे नृत्यनाट्य यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर झाले. प्रेक्षकांनी या प्रयोगाला अक्षरशः डोक्यावर घेतले. या नृत्यनाट्याची सुरुवात पायात बाण लागलेल्या श्रीकृष्णापासून होते. श्रीकृष्ण स्वतःच आपल्या अवतारकार्याची प्रेरणा, गरज आणि अपरिहार्यता प्रेक्षकांसमोर मांडतात. यानंतर फ्लॅशबॅक तंत्राने बालकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग दाखवले जातात. यात कंसवध, राधेसोबतचे हळवे क्षण आणि योगेश्वर श्रीकृष्णापर्यंतचा प्रवास उलगडतो. द्रौपदी वस्त्रहरण, कृष्णशिष्टाई अयशस्वी होणे, युद्धाचा निर्णय, गीतोपदेश, भीष्म-द्रोण-कर्ण-दुर्योधनवधाचे प्रसंग, गांधारीचा शाप आणि यादवांचा वंशनाश असे टप्पे यात होते. पुन्हा पायात बाण लागलेल्या श्रीकृष्णापर्यंत हे वर्तुळ पूर्ण होताना प्रेक्षक भारावून गेले. हा प्रयोग इथेच थांबला नाही, तर ‘यदा यदा हि धर्मस्य…’ या वचनाची पूर्तता करण्यासाठी मी पुन्हा अवतार धारण करेन, असा संदेशही त्याने दिला. मानवी जीवनातील आशा-निराशा, महत्त्वाकांक्षा, सत्तालालसा, कुटिलता, नैतिक-अनैतिकतेचे अर्थ आणि जय-पराजयाच्या संकल्पनांचे विश्लेषण यात होते. हे नृत्यनाट्य प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे ठरले. या प्रयोगाला पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू, पुणे पुस्तक महोत्सवाचे राजेश पांडे, संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे, सचिन साळुंके, सचिन आडेकर, अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नृत्यनाट्यातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात सहनिर्माते केदार सोमण, सूत्रधार व निर्मिती व्यवस्थापक निखिल निगडे, संगीत दिग्दर्शक तन्मय भिडे व ऋतुराज साठे, संगीत संयोजक विवेक वनारसे, प्रकाश योजनाकार तेजस देवधर, केशभूषाकार शीतल पळसांडे यांचा समावेश होता. याशिवाय नृत्यनाट्याच्या दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, संकल्पनाकार, सहनिर्मात्या आणि प्रमुख अभिनेत्री संस्कृती बालगुडे, तसेच विद्या दिढे, रिचा बापट, तितली घोटक, नक्षत्रा कुलकर्णी, स्पृहा कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. संस्कृती बालगुडे म्हणाल्या, “या हाऊसफुल प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते. या प्रयोगाचे यश प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच अवलंबून आहे. भरतनाट्यम नृत्यशैलीतून सादर होणारे हे नृत्यनाट्य कल्पकतेने रचल्यामुळे लहान आणि मोठ्यांनाही सहज समजणारे आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *