Headlines

महाराष्ट्रातील स्मार्ट शेतीसाठी 90 कोटींची परदेशी गुंतवणूक:दावोस करारांतर्गत न्यूट्रीफ्रेश फार्म्सला अमेरिकेकडून निधी, प्रकल्प लवकरच कार्यान्वित




महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (यूएसआयडीएफसी) या संस्थेकडून 90 कोटी रुपयांची गुंतवणूक न्यूट्रीफ्रेश फार्म्सला प्राप्त झाली आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य कराराचा हा एक भाग आहे. दावोस येथे महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स आणि न्यूट्रीफ्रेश फार्म्स यांच्यात नियंत्रित वातावरणातील शेतीसाठी 2500 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला होता. यापैकी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक अमेरिकेतून अपेक्षित होती. प्राप्त झालेली 90 कोटींची रक्कम ही त्यातील पहिली गुंतवणूक आहे. या निधीतून पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि नागपूर येथे प्रकल्प कार्यान्वित केले जातील, अशी माहिती रूरल एन्हान्सर्सचे संस्थापक व सीईओ अंबर आयदे यांनी दिली. जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कृषी व अन्नसुरक्षा क्षेत्रावर जागतिक गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्याचे हे प्रतीक आहे, असे आयदे म्हणाले. स्मार्ट शेतीसाठी झालेल्या सामंजस्य करारानंतर महाराष्ट्राला मिळालेली ही पहिली थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आहे. या निधीमुळे अत्याधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारणी, तंत्रज्ञान-आधारित शेती प्रणालींचा विस्तार आणि निर्यात-केंद्रित कृषी पुरवठा साखळी बळकट करण्यात मदत होईल. यामुळे महाराष्ट्र उच्च कार्यक्षमतेच्या आणि तंत्रज्ञानाधारित शेतीसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल. न्यूट्रीफ्रेश फार्म्सचे सहसंस्थापक गणेश निकम यांनी सांगितले की, या भांडवली गुंतवणुकीमुळे नियंत्रित वातावरणीय शेती (सीईए) पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. यामुळे अचूक तंत्रज्ञानाधारित शेती, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ साध्य होईल. तसेच, या उपक्रमाद्वारे निर्यातक्षम कृषी पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट असून, राज्याला उच्च कार्यक्षमतेच्या शेतीचे केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाईल. या गुंतवणुकीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “डीएफसीची ही गुंतवणूक आमच्या दावोस येथील वचनबद्धतेचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे. अशा भागीदारींच्या माध्यमातून आम्ही अचूक शेतीकडे होणारा बदल अधिक वेगाने घडवून आणत आहोत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत आहोत आणि जागतिक अन्न प्रणालीत महाराष्ट्राची भूमिका अधिक मजबूत करत आहोत.” या प्रकल्पांतर्गत नियंत्रित पर्यावरणाधारित क्लस्टर शेतीवर भर दिला जाणार असून, निर्यात-केंद्रित कृषी पायाभूत सुविधांना चालना मिळेल. अमेरिकेतील ‘डीएफसी’कडून न्यूट्रीफ्रेश फार्ममध्ये एकूण 500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे, त्यापैकी 90 कोटींचा हा पहिला हप्ता आहे. हे प्रकल्प जुलै 2026 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *