![]()
शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’अंतर्गत वाहिनी विलगीकरण आणि यंत्रणा सक्षमीकरणाची सर्व आवश्यक कामे मिशन मोडवर पूर्ण करा, असे कडक निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) भुजंग खंदारे यांनी दिले. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात शुक्रवारी (25 सप्टेंबर) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सौर उर्जेतून 16 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना कार्यकारी संचालक खंदारे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे. या योजनेतून 16 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करून ती थेट कृषिपंपांना पुरवली जाणार आहे. यासाठी सोलार पार्क उभारणी, वाहिनी विलगीकरण, नवीन उपकेंद्रांची निर्मिती, अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे यांसारखी कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सध्या बहुतांश ठिकाणी कृषिपंपांना सकाळी 9 ते दुपारी 5 या वेळेत वीज दिली जाते; मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे सर्व कार्यकारी अभियंते व उपविभागीय अभियंत्यांनी स्वतः लक्ष घालून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत. यासाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री मुख्यालयाकडून पुरवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कामांच्या प्रगतीचा आढावा दर आठवड्याला मुख्यालयातून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटरचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवा ग्राहकांना अचूक व वेळेवर वीजबिल मिळण्यासाठी स्मार्ट मीटर अत्यंत महत्त्वाचे आहे. घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरावर 85 पैसे प्रतियुनिट टीओडी (ToD) सवलत दिली जाते आणि ही सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट मीटर अनिवार्य आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरचे फायदे ग्राहकांना पटवून देऊन ते बसवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला अधीक्षक अभियंता बिना सावंत, प्रभारी अधीक्षक अभियंता विनय घनबहादूर, कार्यकारी अभियंता राजेंद्र नाहटा, प्रेरणा बनकर, रमेश वाघचौरे, अविनाश राऊत, अशोक जाधव, प्रणाली विश्लेषक राजाराम पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Source link
महावितरण ॲक्शन मोडवर!:कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा; कामांचा दर आठवड्याला आढावा, कार्यकारी संचालक खंदारे यांचे निर्देश