![]()
पाटोदा येथील हजरत राज मोहंमद उर्दू प्राथमिक शाळेत अनुदान लाटण्यासाठी ३७ ते ४७ वर्षे वयाच्या २९ प्रौढांना विद्यार्थी म्हणून दाखवले. विद्यार्थ्यांच्या यादीत प्रौढांची नावे घुसवल्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे उपलब्ध आहेत. पाटोदा येथे हजरत राज मोहंमद ही उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. शाळेने युडायस आणि सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची चुकीची माहिती भरली. प्रौढ नागरिकांच्या आधार कार्डचा गैरवापर करून त्यांना कागदोपत्री विद्यार्थी दाखवले आहे. ऑनलाइन पोर्टलवर १०० विद्यार्थी अपलोड केले असले तरी त्यापैकी तब्बल २९ विद्यार्थ्यांचे तपशील अवैध आढळले. शाळेतील बहुतांश विद्यार्थी ढाळेवाडी रोडवरील मदरशात जातात. विद्यार्थ्यांसाठी बसण्याची पुरेशी जागाही शाळेत उपलब्ध नाही तसेच शाळेत अभिप्राय पुस्तिका आणि व्यवस्थापन समितीच्या बैठकांचे कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नाहीत. शिक्षण विभागाची नोटीस, शाळेने उत्तरच दिले नाही ७ फेब्रुवारीला शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांनी शाळेला भेट दिली होती. मात्र, मुख्याध्यापकांनी दस्तऐवज उपलब्ध करून दिले नाहीत. त्यानंतर ६ मार्चला नोटीस बजावली होती. तिला शाळेने कोणतेही उत्तर दिले नाही. मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव दिला बनावट विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले जात असल्याने या शाळेचे अनुदान तत्काळ स्थगित करून मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव बीड जिल्हा परिषदेच्या िशक्षण विभागाने उपसंचालकांकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर आता अंतिम टप्प्यातील कार्यवाही सुरू आहे. मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न: मुख्याध्यापक सय्यद हादी आम्ही पूर्ण रेकॉर्ड उपलब्ध करून दिले. कोणीतरी त्रास देण्यासाठी हे करतंय. यापूर्वीही दोन-तीनदा तक्रार झाली, त्यातून आम्ही निर्दोष सुटलो. बीईओंनी शाळेत चौकशी केली आहे, असे मुख्याध्यापक सय्यद हादी म्हणाले.
Source link
दिव्य मराठी एक्स्पोज:अनुदान लाटण्यासाठी पाटोद्यातशाळेने प्रौढांना दाखवले विद्यार्थी, प्राथ. शाळेत ३७ ते ४७ वर्षांचे २९ विद्यार्थी