Headlines

704 वटवृक्षांचा टप्पा; 50 वृक्षांची जबाबदारी शिष्यांनी स्वीकारली:कापूरच्या गुरुकुलम गोशाळेत 14 फुटी वटवृक्षांची केली लागवड




‘झाड लावणे सोपे; मात्र ते स्वतःच्या बळावर उभे राहेपर्यंत जगवणे हीच खरी वृक्षसेवा’ या विचारातून कर्म फाउंडेशनच्या ‘लक्ष्य १००० वटवृक्ष’ उपक्रमाने ७०४ वटवृक्षांचा टप्पा पूर्ण केला. आष्टी तालुक्यातील शेकापूर येथील सनातन गुरुकुलम गोशाळेच्या परिसरात तब्बल १४ फुटी ५० वटवृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे वृक्ष लावून थांबण्याऐवजी ते स्वयंभू होईपर्यंत जगवण्याची जबाबदारी गोशाळेने स्वीकारली. सनातन गुरुकुलम गोशाळेचे प्रमुख परमेश्वर महाराज शास्त्री व त्यांच्या शिष्यांनी या ५० वटवृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. वृक्षांना नियमित पाणी मिळावे यासाठी परिसरात स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्यात आली असून ठिबक सिंचनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे वटवृक्षांच्या नियमित पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हे वृक्ष गोशाळेलगत लावण्यात आले आहेत. यामुळे येथील गोशाळेसाठी दाट झाडीची सावली व थंडावा मिळणारा आहे. उपक्रमाच्या समारोपावेळी कर्म फाउंडेशनचे सदस्य तसेच गोशाळेतील शिष्यांनी एकत्रितपणे वटवृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. ‘वटवृक्ष स्वयंभू होईपर्यंत त्यांना जगवू आणि त्यांचे संवर्धन करू,’ असा निर्धार यावेळी करण्यात आला. या वृक्षाचे दान, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगरचे माजी अध्यक्ष सुभाष गर्जे यांनी केले. वाढदिवसाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता भविष्यातील पिढ्यांना सावली देणाऱ्या वृक्षांच्या रूपाने साजरा करण्याचा हा उपक्रम ठरला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर कांगणे व गोशाळेचे सेवक सचिन बडे यांनी केले. नेहा जाधव, स्नेहल क्षीरसागर, सुहास क्षीरसागर, पुरुषोत्तम जाधव, विशाल डापसे, अमोल काळे, बाळासाहेब निमसे, मधुकर निकम, योगेश दुधाडे, रामनाथ गेंडाळ, राजाभाऊ ढोबळे, युवराज देवकर व रोहिदास खंडागळे आदी उपस्थित होते. काय आहे वडाचे पर्यावरणीय महत्व… भारतीय वन्यजीव संस्थेच्या अभ्यासानुसार फिकस प्रजाती पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यांची फळे अनेक फळभक्षी पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अन्नस्रोत ठरतात. काही वनक्षेत्रांमध्ये इतर फळांची उपलब्धता कमी असतानाही फिकसची फळे पक्ष्यांना उपलब्ध होतात. वडाच्या विस्तीर्ण फांद्या व दाट छत्री पक्ष्यांना विसावा, अधिवास आणि घरटी बांधण्यासाठीही जागा उपलब्ध करून देतात. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागानेही वडाच्या विस्तीर्ण मुळांच्या व फांद्यांच्या जाळ्यामुळे विविध पक्षी व कीटकांना अधिवास मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे. …म्हणून केला संकल्प, आता संवर्धनासाठीही प्रयत्न ^ विकासकामांसाठी मोठी वृक्ष तोडली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर मयूर कांगणे यांनी विरोध केला. पण त्यांना जुमानले नाही. ही घटना १० वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर त्यांनी वृक्षलागवडीचा संकल्प केला. आष्टी भागात पाऊस कमी असल्याने या ठिकाणी बोअरवेल घेऊन पाण्याची टाकी व ठिबकचा आग्रह धरला. मयूर कांगणे, पर्यावरण प्रेमी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *