Headlines

स्मिता राजहंस, प्राजक्ता हुशांगाबादकर यांना 'जंगल बेल्स' पुरस्कार:वन्यजीव संवर्धनातील योगदानाबद्दल 2026 चा 'वुमन ऑफ द वाइल्ड' पुरस्कार जाहीर




जुन्नर वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि प्रसिद्ध वन्यजीव जीवशास्त्रज्ञ व संवर्धन कार्यकर्त्या प्राजक्ता हुशांगाबादकर यांना वन्यजीव संवर्धनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘जंगल बेल्स वुमन ऑफ द वाइल्ड पुरस्कार – 2026’ प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील वन्यजीवप्रेमी हेमांगी वर्तक आणि संजय देशपांडे यांनी वन्यजीव संवर्धनातील महिलांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली आहे. स्मृतिचिन्ह आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्काराचे हे सलग दुसरे वर्ष आहे. जंगल बेल्स ही संस्था महिला आणि मुलांमध्ये वन आणि वन्यजीव संवर्धनाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी गेली 7 वर्षे कार्यरत आहे. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे सायंकाळी 6:00 होणाऱ्या पुरस्कार समारंभात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतील. कार्यक्रमास राज्यसभा खासदार आणि विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षा मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आशीष ठाकरे (आयएफएस) यांचीही कार्यक्रमास उपस्थिती असेल. या पुरस्काराच्या निवड समितीत माजी वन अधिकारी सुनील लिमये (आयएफएस), आशीष ठाकरे (आयएफएस) आणि प्रसिद्ध वन्यजीव संवर्धन तज्ञ अनुज खरे यांचा समावेश होता.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागात कार्यरत असलेल्या स्मिता राजहंस यांनी बिबट्या-मानव संघर्षाचे व्यवस्थापन, बिबट्यांच्या बछड्यांचे पुनर्वसन, विशेष बचाव व जेरबंद मोहिमा तसेच ऊस शेतीतील बिबट्यांच्या वास्तव्याशी संबंधित आव्हानांवर उल्लेखनीय काम केले आहे. बिबट्यांच्या 54 बछड्यांची त्यांच्या मातांशी यशस्वी पुनर्भेट घडवून आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, त्यांनी 50 हून अधिक बिबट्यांना वाचवण्याच्या बचाव मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. प्राजक्ता हुशांगाबादकर या प्रसिद्ध वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि संवर्धन कार्यकर्त्या आहेत. भारतातील मानव-वन्यजीव संघर्ष समजून घेणे व त्याच्या व्यवस्थापनासाठी काम करण्याबरोबरच त्यांनी वाघ तसेच इतर मोठ्या मांसाहारी प्राण्यांचे संवर्धन, निरीक्षण आणि संशोधन या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या नेटवर्क फॉर कन्झर्व्हिंग सेंट्रल इंडिया येथे नेटवर्क समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. संशोधन, संवर्धनाची प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि स्थानिक समुदाय यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी त्या काम करतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *