Headlines

डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात हातोडा, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी!:गच्चीवरून प्रवेश करत पाण्याच्या टाकीचे कनेक्शन तोडले; पहाटेच्या सुमारास धुमाकूळ




महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी एका अज्ञात तरुणाने बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 26 सप्टेंबर रोजी घडली. पहाटे 3 वाजेच्या सुमारास या घुसखोराने बंगल्याच्या गच्चीवरून आत प्रवेश केला. त्यानंतर सकाळी 6.15 च्या सुमारास ही बाब लक्षात आल्यावर, सकाळी 7 वाजता बंगल्यावरील सुरक्षारक्षक आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी या संशयिताला रंगेहात पकडले. या घटनेमुळे डॉ. गोऱ्हे यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणाची झडती घेतली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. त्याच्या बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे 10 मीटर लांबीची दोरी आढळून आली आहे. विशेष म्हणजे, घरात प्रवेश करण्यापूर्वी या तरुणाने बंगल्यावरील पाण्याच्या टाकीचे कनेक्शन तोडून बंद केल्याचेही प्रथम माहिती अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या या तरुणाने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आपण केवळ एक विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची अनेक ओळखपत्रे सापडल्याने त्याच्या या दाव्यावर मोठा संशय निर्माण झाला आहे. सुदैवाने, या भयंकर घटनेच्या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे या घरात उपस्थित नव्हत्या. मात्र, संशयित ओळखपत्रांमुळे या तरुणाची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. तपासात राजकीय दबावाचा संशय दरम्यान, या अत्यंत गंभीर प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संशयित तरुणाला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून पोलिसांवर दबाव आणला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे तपासावर परिणाम होऊ नये आणि सत्य न लपण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. निष्पक्ष सखोल तपासाची मागणी एका लोकप्रतिनिधीच्या घरात पहाटेच्या वेळी हत्यारांसह घुसखोरी करणे आणि पाण्याच्या टाकीचे कनेक्शन जाणीवपूर्वक तोडणे, यामागे नेमका काय हेतू होता? हा तरुण केवळ चोरीच्या उद्देशाने आला होता की यामागे काही मोठे राजकीय किंवा वैयक्तिक षड्यंत्र आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *