![]()
हिंगोली तालुक्यातील इसापूर रमना येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांचे हिंगोलीच्या सेवा सदनाने पालकत्व स्वीकारले असून या मुलांच्या शिक्षणाचा स्ंपूर्ण खर्च सेवा सदन करणार असल्याचे सदनाच्या संचालिका मीरा कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी कुटुंबाची रविवारी ता. 27 भेट घेतल्यानंतर हा निर्णय जाहिर केला आहे. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीरा कदम आणि धनराज कदम यांनी तातडीने वाढवे कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील आक्रोश, पोरक्या झालेल्या लेकरांच्या आणि विठ्ठल वाढवे यांच्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून सर्वांचेच मन हेलावले. याच भेटीत मिरा कदम यांनी या कुटुंबातील शरद आणि अंकिता या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची घोषणा केली. सेवासदनच्या माध्यमातून या लेकरांना शिक्षणासाठी बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली तालु्क्यातील इसापूर रमना येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. या घटनेमुळे वाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. दरम्यान, हिंगोलीच्या सेवा सदन वसतीगृहाचे संस्थापक धनराज कदम, संचालिका मीरा कदम यांनी नुकतीच वाढवे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी घरी असलेल्या दोन चिमुकल्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संचालिका तथा शिक्षीका असलेल्या मीरा कदम यांनी या दोन मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सेवासदन उचलणार असल्याचे जाहिर करून टाकले. तर मुलांच्या शैक्षणिक प्रगती व त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी संदीप नागरे, विठ्ठल चोतमल, पांडुरंग जगताप , ज्ञानेश्वर जगताप ,हनुमान जगताप , बालाजी जगताप यांची उपस्थिती होती.दरम्यान, कदम यांच्या या निर्णयामुळे मुलांना शिक्षणासाठी बळ मिळणार आहे. तर त्यांच्या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत करून कदम दाम्पत्याकडून आत्महत्याग्रस्त व अनाथ मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या सेवा सदनाच्या उपक्रमाचे कौतूक केले. मुलांना शिक्षण देऊन पायावर उभे करणार- मीरा कदम या मुलांना वडिलांची माया देऊ शकत नाहीत, मात्र त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर नक्कीच उभे करणार आहे. शेतकरी भावांनो काळ कितीही कठीण असला तरी आत्महत्या करू नका. लेकरांच्या आयुष्यात बाप माणूस खूप महत्त्वाचा असतो. घरात बाप नसेल तर लेकरं आत्मविश्वास गमावून बसतात. तुम्ही निघून जाता, पण कुटुंबाला अवितर संघर्ष करावा लागतो हे लक्षात घ्या.
Source link
हिंगोलीत इसापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार:दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च 'सेवा सदन' उचलणार