![]()
“केंद्रीय निवडणूक आयोग ही आता निष्पक्ष संस्था राहिलेली नसून ती पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची ‘कठपुतळी’ बनून लोकशाहीची पद्धतशीर हत्या करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बेकायदेशीर कारभाराची पोलखोल झाली, तर भविष्यात पुन्हा सत्तेवर येता येणार नाही आणि देश विकता येणार नाही, या भयापोटीच भाजपचे सर्व राज्यांतील मुख्यमंत्री ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी सरसावले आहेत,” असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरील भ्रष्टाचाराचे आरोप, महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाचा अंतर्गत संघर्ष आणि राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. लोकांच्या मतांवर नव्हे, निवडणूक आयोगाच्या ताकदीवर बसलेले सरकार निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर बोलताना नाना पटोले म्हणाले, “मतदार यादीतील फेरफार, बोगस नावे आणि ‘एसआयआर’च्या नावाखाली झालेली मतदारांची लूट याविषयी आम्ही पुराव्यासह अनेक उदाहरणे निवडणूक आयोगासमोर मांडली; मात्र मुख्य निवडणूक आयुक्त काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते फक्त भाजपच्या इशाऱ्यावर नाचत आहेत.” सत्तेची पोलखोल होण्याची भीती “केंद्रात आणि राज्यात बसलेले सरकार हे लोकांच्या खऱ्या मतांवर निवडून आलेले नसून मॅनिपुलेशन करून सत्तेवर आले आहे. जर निवडणूक आयोगाचा हा महाघोटाळा उघडा पडला, तर आपली सत्ता कायमची जाईल आणि देश विकण्याचे षडयंत्र थांबेल, याच दहशतीतून भाजपचे नेते आता ज्ञानेश कुमारांच्या बचावासाठी ढाल बनून पुढे आले आहेत.” एकनाथ शिंदेंसोबत ‘चारसौबीसी’ झाली; महायुतीचे वाजले तीन-तेरा! महायुतीमधील सत्तासंघर्षावर आणि शिंदे गटाच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची सुरू असलेल्या मागणीवर त्यांनी सडकून टीका केली. “एकनाथ शिंदे स्वतः वारंवार सांगत असतात की, 2022 मध्ये केंद्रीय भाजप नेतृत्वाने त्यांना ‘तुम्ही सरकार आणा, आम्ही तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करू’ असा शब्द दिला होता. मात्र, आता त्यांच्यासोबत भाजपने ‘चारसौ बीसी’ केल्याची भावना शिंदेंच्या आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. म्हणूनच त्यांच्या पक्षाचे नेते अस्वस्थ होऊन शिंदेंनाच मुख्यमंत्री करा अशी विधाने करत आहेत.” “महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा आव आणला जात असला, तरी प्रत्यक्षात यांचे तीन-तेरा वाजले आहेत. केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेल्या या साठमारीमुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.” कागदी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकता येणार नाही राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा आरोप केला. “राज्यात भयानक दुष्काळ पडलेला असताना महायुती सरकारने पूर्णपणे पाठ फिरवली होती. आम्ही सतत जनआंदोलने केली, दबाव निर्माण केला, राज्यपाल महोदयांची भेट घेऊन निवेदन दिले. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून मदत वाटप सुरू केले, मग महाराष्ट्रात हा निर्णय घ्यायला इतका उशीर का झाला? सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या आहेत?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. “सरकारने केवळ कागदोपत्री 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असला, तरी या घोषणाबाज सरकारवर राज्यातील शेतकऱ्यांचा काडीचाही विश्वास उरलेला नाही. शेतात काहीच उरलेले नसल्याने आजही रोज शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करत आहेत.” 3 दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा! दुष्काळावर ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची आग्रही मागणी केली. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, ती अत्यंत रास्त आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी आणि हेक्टरी भरीव रोख मदत जाहीर करण्यासाठी सरकारने तातडीने किमान ३ दिवसांचे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे,” अशी मागणी नाना पटोले यांनी शेवटी केली. ———————- हेही वाचा… निवडणूक आयोगावर बोलतोय तर भाजपला का त्रास होतोय?: ‘शिवतीर्था’वरून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंची संयुक्त गर्जना; 4 ऑक्टोबरला भायखळा ते मुंबई महापालिकेपर्यंत विराट जनमोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर अत्यंत ऐतिहासिक राजकीय चित्र पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद घेत 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या महामोर्चाची अधिकृत घोषणा केली. “हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा सत्तेच्या स्पर्धेचा नसून, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, सर्वांच्या हातात फक्त राष्ट्रध्वज तिरंगाच फडकेल,” अशी साद दोन्ही ठाकरे बंधूंनी तमाम जनतेला आणि सर्वपक्षीय नेत्यांना घातली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
'कठपुतळी' बनलेल्या ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री मैदानात:'SIR'ची पोलखोल झाली तर सत्ता टिकणार नाही आणि देश विकता येणार नाही!, नाना पटोलेंचा हल्लाबोल