![]()
बारामती तालुक्यातील शेरेवाडी (बाबुर्डी) गावात ओसरीत झोपलेल्या २ वृद्ध महिलांची अज्ञाताने शस्त्राने गळा चिरून हत्या केली. इंदुमती मारुती लडकत (७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (६५) अशी मृत महिलांची नावे असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.
.
मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लुटण्यात आल्याचे समोर आल्याने चोरीच्या उद्देशातून हे दुहेरी हत्याकांड झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
इंदुमती लडकत या शेरेवाडी येथील आपल्या घरी राहत होत्या. त्या बाबुर्डी गावच्या माजी सरपंच होत्या. त्यांना दोन मुले असून एक मुलगा बारामती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर दुसरा बेंगळुरू येथे नोकरीला आहे.
कृष्णाबाई लडकत या इंदुमती यांच्या शेजारी राहत होत्या. इंदुमती यांना सोबत मिळावे म्हणून त्या अनेकदा रात्री त्यांच्या घरी झोपण्यासाठी येत असत. सोमवारी रात्रीही दोघी घराबाहेरील ओसरीत झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात शिरली. त्यानंतर दोन्ही महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा गळा चिरण्यात आला.