Headlines

किल्लारी भूकंपाला 33 वर्षे पूर्ण!:30 सप्टेंबरची ती 'काळरात्र' महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, अमित देशमुखांनी व्यक्त केल्या भावना




30 सप्टेंबर 1993 ची ती भयंकर पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. गणपती विसर्जनानंतरच्या त्या रात्री संपूर्ण महाराष्ट्र साखरझोपेत असताना, लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे अचानक आलेल्या विनाशकारी भूकंपाने हादरून गेली, ज्यामध्ये हजारो निष्पाप लोक झोपेतच ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. कुटुंबच्या कुटुंब रात्रीतून उद्ध्वस्त झाले. आज या घटनेला 33 वर्ष पूर्ण झाले आहेत. या विषयी लातूरचे कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री अमित देशमुख यांनी ट्विट करत त्या भयंकर घटनेवर भाष्य केले आहे. आमदार अमित देशमुख यांनी म्हटले की, 30 सप्टेंबर 1993… महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील ती काळरात्र, जी काळाच्या ओघात कधीही विसरता येणार नाही. पहाटेच्या वेळी झालेल्या प्रलयकारी भूकंपाने लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील किल्लारी, सास्तूरसह अनेक गावांना अक्षरशः उद्ध्वस्त केले. या भीषण नैसर्गिक आपत्तीत जवळपास दहा हजार निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, हजारो जण जखमी झाले आणि असंख्य कुटुंबांचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले. पुढे अमित देशमुख म्हणतात की, या महाभयंकर संकटाच्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने संपूर्ण जगाने दखल घ्यावी असा ऐतिहासिक पुनर्वसन प्रकल्प राबवला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लातूरचे तत्कालीन पालकमंत्री विलासराव देशमुख आणि धाराशिवचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी अनेक महिने आपत्तीग्रस्त भागात थांबून पुनर्वसनाच्या कामाला गती दिली. आपत्तीग्रस्तांना आधार व धीर देण्याचे काम सरकारने केले. भूकंप पुनर्वसन काळात जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आदरणीय दिलीपराव देशमुख यांनीही पुनर्वसनाचे काम दर्जेदार आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी अथक परिश्रम घेतले. किल्लारी-सास्तूर पुनर्वसनाचा हा प्रकल्प आजही आपत्तीच्या काळात शासनाने जनतेच्या पाठीशी कसे ठामपणे उभे राहावे, याचे आदर्श उदाहरण म्हणून स्मरणात आहे. आज या प्रलयकारी भूकंपाच्या स्मृती जाग्या होत असताना, त्या काळातील माणुसकी, संवेदना आणि जनसेवेची परंपरा पुढे नेत लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहण्याची बांधिलकी जपण्याचा माझा कायम प्रयत्न राहील, असे म्हणत अमित देशमुख यांनी भूकंपात प्राण गमावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. भूकंपाची ती काळरात्र आजही महाराष्ट्राच्या स्मरणातून पुसलेली नाही- धीरज देशमुख यावर कॉंग्रेस नेते धीरज देशमुख यांनी देखील या घटनेवर भाष्य करत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले की, किल्लारीच्या भूकंपाची ती काळरात्र आजही महाराष्ट्राच्या स्मरणातून पुसलेली नाही. 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटेच्या भूकंपाने किल्लारीसह परिसरातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आणि हजारो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. एका क्षणात अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या भीषण आपत्तीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब, तत्कालीन महसूल मंत्री व लातूरचे पालकमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब तसेच आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी मदतकार्याला गती देत आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संकटग्रस्तांना आधार देत, त्यांचे अश्रू पुसत आणि उद्ध्वस्त झालेली घरे-संसार पुन्हा उभे करण्यासाठी अथक प्रयत्न केले. किल्लारीच्या पुनर्निर्माणाची गाथा ही केवळ मदतकार्याची नव्हे, तर माणुसकी, धैर्य आणि संकटात एकजुटीने उभे राहण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.या महाभयंकर भूकंपात प्राण गमावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत धीरज देशमुख यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *