Headlines

'त्या' मफलरवाल्याचा पर्दाफाश 10 तारखेला करणार!:रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा- पुढच्या कॅबिनेटमध्ये हेक्टरी 1 लाख न दिल्यास समृद्धी महामार्ग रोखणार




“राज्यातील शेतकरी आणि शेतमजूर 1972 पेक्षाही भीषण अशा दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. केंद्राच्या ‘इस्रो’च्या (ISRO) संकेतस्थळावर कोणत्या तालुक्यात पावसाची तूट आहे हे स्पष्ट दिसत असताना, हे सरकार मात्र गाढ झोपले होते. सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर घाईगडबडीत 40 तालुक्यांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, केवळ कागदोपत्री दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; पुढच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि मजुरांना 25 हजार रुपयांची मदत जाहीर झाली नाही, तर आम्ही शेतकरी आणि मजुरांना घेऊन समृद्धी महामार्ग अडवल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट आणि आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. नाशिकमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे या नवी दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित असल्याने त्यांच्या जागी नाशिकला आल्याचे सांगत, रोहित पवारांनी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या पाहणी दौऱ्यावर रवाना होत असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत त्यांनी दुष्काळ, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा, दादांच्या मृत्यूतील संशयित मफलरवाला आणि नाशिकमधील भ्रष्टाचारावर चौफेर हल्ला चढवला. इस्रोच्या वेबसाईटवर दुष्काळ दिसतो, पण राज्य सरकार झोपले होते राज्य सरकारच्या दुष्काळ जाहीर करण्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना रोहित पवार म्हणाले, “ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जर सरकारने जमिनीवर नीट सर्वेक्षण केले असते, तर खरी परिस्थिती समोर आली असती. मात्र, सरकार झोपलेले होते. जनक्षोभ आणि सत्ताधारी आमदारांचा दबाव वाढल्याने त्यांनी घाईघाईने निर्णय घेतले. उशिरा का होईना सरकारने आणखी 40-43 तालुक्यांचा समावेश केला, याबद्दल आभार; पण आमची मूळ मागणी सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची होती. अजूनही अनेक भाग वंचित आहेत.” मदतीचा अल्टिमेटम “आम्ही सुरुवातीला 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी करत होतो. पण 16-17 जिल्ह्यांत हजारो शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळालेली नाही आणि यंदा रब्बीही हातून गेली आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांच्या पत्रानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 1 लाख रुपये आणि शेतमजूर कुटुंबाला 25 हजार रुपयांची रोख मदत दिलीच पाहिजे. पुढील कॅबिनेटमध्ये हा निर्णय न झाल्यास समृद्धी महामार्ग पूर्णपणे ठप्प केला जाईल.” परीक्षा फी नव्हे, संपूर्ण शैक्षणिक फी माफ करा; 100 रुपयांत काय होणार? पालकमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलेल्या 10 वी आणि 12वीच्या परीक्षा शुल्क माफीवर टीका करताना ते म्हणाले, “10 वी-12 वीचे परीक्षा शुल्क म्हणजे केवळ 100 रुपयांची सवलत आहे. गेल्या वेळी अतिवृष्टीदरम्यान केवळ 30 कोटी रुपये माफ करून शासनाने पाठ थोपटून घेतली होती. या 100 रुपयांनी संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांचे काय भले होणार?” शक्तिपीठ महामार्ग रद्द करा “1 लाख कोटींचा निरुपयोगी शक्तिपीठ महामार्ग तातडीने रद्द करा आणि त्या पैशातून दुष्काळग्रस्त भागातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करा. अन्यथा दुष्काळामुळे ग्रामीण भागातील हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहतील.” MPSCचे विद्यार्थी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाची हाक एमपीएससी (MPSC) परीक्षा सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर रोहित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. “पुणे पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीने 15-16 आंदोलक विद्यार्थी प्रतिनिधी आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. आज मुख्यमंत्री विद्यार्थ्यांची बाजू घेतात की आपल्या मित्रांची, हे स्पष्ट होईल.” विद्यार्थ्यांच्या 5 प्रमुख मागण्या तो मफलर कोणाचा? 10 तारखेला नाव जाहीर करणार! अजितदादा यांच्या निधनासंदर्भात आणि व्हीएसआर कंपनीच्या संशयास्पद तपासावर केलेल्या विधानावर रोहित पवारांनी गूढ वाढवले. “मी मफलर घालणाऱ्या सामान्य नेत्यांबद्दल बोलत नाहीये. एका विशिष्ट कार्यक्रमात ज्या व्यक्तीने तो मफलर घातला होता, ती व्यक्ती व्हीएसआरला वाचवण्यासाठी आणि पोलिसांच्या निष्पक्ष तपासावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा संपूर्ण पर्दाफाश मी येत्या 10 ऑक्टोबरला पुराव्यानिशी करणार आहे.” नाशिकमधील भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि स्थानिक भ्रष्टाचारावर त्यांनी गृहमंत्रालयाला लक्ष्य केले. “नाशिकमध्ये देवाच्या नावावर आणि विविध प्रकल्पांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांना राजीनामा देण्याची किंवा आपली नावे बदलण्याची वेळ लवकरच येईल, इतके पुरावे समोर आले आहेत.” “ठाण्यात शिवसेना (UBT) च्या पदाधिकाऱ्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या होते, ज्याचे लागेबांधे स्थानिक उपमहापौरांशी जोडले जातात. बारामतीत दोन निष्पाप महिलांची निर्घृण हत्या होते आणि रस्त्यावर गँगवॉर सुरू होते. पोलीस केवळ व्हीआयपींच्या सुरक्षेत व्यस्त असून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. गृहखात्याचा पोलिसांवर कोणताही धाक राहिलेला नाही,” असा घणाघाती आरोप रोहित पवार यांनी शेवटी केला. —————————————– हेही वाचा… ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या: पूर्णेकर कुटुंबीयांचे माजी महापौरांवर गंभीर आरोप, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *