![]()
सेनगाव येथील शासकीय गोदामात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ता. 30 भेट देऊन पाहणी केली. यामध्ये गव्हात किडे तर तांदूळाची चुरी झालेली आढळून आली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे. सेनगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जाते. त्यासाठी शासकीय गोदामात धान्य साठवणुक करण्यात आली. या ठिकाणी सुमारे 4 हजार क्विंटल गहू असून सुमारे 3 हजार क्विंटल तांदूळ आहे. मात्र ग्रामीण भागात धान्य वाटप सुरु झाल्यानंतर धान्याच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या जाऊ लागल्या होत्या. याप्रकरणात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, पदाधिकारी प्रविण महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी ता. 30 स्वस्त धान्य साठवलेल्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये गव्हामध्ये मोठ्या संख्येने किडे आढळून आले तर तांदूळ अगदीच चुरी झालेला दिसून आला. या प्रकारामुळे देशमुख यांनी तिव्र संताप व्यक्त केला. लाभार्थ्यांना दिले जाणारे निकृष्ठ धान्य जनावरांना खाण्याच्या लायकीचे देखील नाही, मग हेच धान्य लाभार्थ्यांना का वाटप करीत आहात असा सवाल त्यांनी केला. या प्रकाराची तातडीने चौकशी करून नवीन धान्य देण्यात यावे तसेच या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांना धान्य खाऊ घालण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. याप्रकारानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी तातडीने सेनगाव येथे भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी गोदामपाल यांना नोटीस देऊन खुलासा मागविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
सेनगावच्या शासकीय गोदामात निकृष्ट धान्याचा साठा:दोषींवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, ठाकरे गटाचा इशारा