![]()
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता आमदार गोपीचंद पडळकर आणि नेते सदाभाऊ खोत यांनीही या निवडणुकीत उतरून रणशिंग फुंकले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात ‘जयंत पाटलाचा बाप आला…’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेवरून आगामी काळात जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बँक शेतकऱ्यांची असून या बँकेच्या माध्यमातून केवळ शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, अशी आपली भावना असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट केले. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पाठिंबा घेऊनच आपण निवडणुकीत उतरलो असल्याचे ते म्हणाले. तसेच, सदाभाऊ खोत यांच्यासह इतर सहकाऱ्यांचेही अनेक अर्ज जिल्हा बँकेसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सध्या सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही निवडणूक बिनविरोध पार पडावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. एकीकडे त्यांनी हे आवाहन केले असले तरी, दुसरीकडे खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील या दोघांनीही या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विश्वजीत कदमांची प्रथमच एन्ट्री सांगली जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी उडी घेतल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनीही सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. कदम यांनी पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Source link
सांगली जिल्हा बँक निवडणूक:गोपीचंद पडळकरांच्या शक्तिप्रदर्शनात जयंत पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी