Headlines

राज्यात पुढील 4 दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा:पुणे, मराठवाड्यासह विदर्भाला यलो अलर्ट, पुणे-साताऱ्यात गारांचा पाऊस




राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच आता वरुणराजाने हजेरी लावत नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा वादळी वारे आणि गारपिटीचे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील ४ दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असल्याची माहिती पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, बीड आणि विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकीकडे पाऊस, दुसरीकडे उन्हाचा चटका राज्यात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पावसाचा अंदाज असतानाच, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढेच राहणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांना पाऊस आणि कडक ऊन अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागणार आहे. सातारा आणि पुण्यात गारांचा पाऊस आज साताऱ्यात आणि पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सातारा शहर आणि ग्रामीण भागात दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. मात्र, महिनाभराच्या प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकर आणि साताराकरांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. विशेषतः लहान मुलांनी गारा वेचण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली होती. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी मात्र धास्तावला आहे. काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विजा कडकडत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका, गारपीट होत असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काढणी झालेला माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *