![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. जे. जे. रुग्णालयातून पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीय आणि हजारो समर्थकांनी तिथेच आक्रोश करत आंदोलन सुरू केले. या कठीण प्रसंगात प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करून केवळ ‘पप्पा’ असे कॅप्शन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सायंकाळी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आक्रमक घटनेचे गांभीर्य ओळखून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी तत्काळ कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा आरोप करत, जोपर्यंत या कथित सूत्रधारांची नावे ‘एफआयआर’मध्ये (FIR) नोंदवली जात नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा नेत्यांनी दिला. दिवसाढवळ्या घडलेली ही घटना पोलिसांसाठी लाजीरवाणी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सुनावले. तर, कुटुंबीय पुरावे देत असताना पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र ठाण्यात उतरेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. जबाबात नावे नोंदवल्यानंतरच मृतदेह ताब्यात मुख्य सूत्रधारांची नावे नोंदवल्याशिवाय पार्थिव ताब्यात न घेण्यावर कुटुंबीय ठाम होते. यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमून तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी मध्यस्थी करत माहिती दिली की, राम पूर्णेकर यांच्या पुरवणी जबाबात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे संशयित म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. या कायदेशीर प्रक्रियेनंतरच कुटुंबीयांनी पूर्णेकर यांचे पार्थिव ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांशी चर्चा केल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींची नावे पुरवणी जबाबात घेण्यात आल्याची माहिती दिली. हत्येमागची संभाव्य कारणे प्रदीप पूर्णेकर हे कायम जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जायचे. गेल्याच महिन्यात त्यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्तांना पत्र दिले होते. तसेच, मानपाडा येथील क्लस्टर योजनेवरूनही काही वाद सुरू होते. त्यामुळे या हत्येचा संबंध ड्रग्स माफिया किंवा क्लस्टरच्या वादाशी आहे का, याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: आतापर्यंतच्या घडामोडींची टाइमलाइन मुलाची भावुक पोस्ट.. ——————— ही बातमी पण वाचा.. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक: SIT स्थापन, 2 DCP, 2 ACP सह विशेष अधिकाऱ्यांचा तपासात समावेश ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार: दोन राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा परिसरातील गणेश नगर येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा
Source link
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर संशयितांची नावे जबाबात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, मुलाची भावुक पोस्ट