![]()
सामाजिक जीवन ज्यावेळी व्यक्त होते, तेथून साहित्याची निर्मिती होत असते. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांचा परस्परांशी जवळचा संबंध असून, आचार्य अत्रे यांच्या प्रमाणे राजकारणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, संघर्ष आणि अनुभव व्यक्त झाले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती वआणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फौंडेशन, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड, सोपाननगर आणि जेजुरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दहावे नांदी साहित्य संमेलन ‘राजकीय साहित्य संमेलन’ म्हणून आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. राजकारणातील विविध विषयांवर भाष्य करताना साहित्य, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती असणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राजकारणात काम करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या असल्या, तरी राजकीय साहित्य हा व्यापक विषय आहे. कायदे, ठराव, मसुदे आणि निर्णय घेताना समाजाची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे राजकारणाशी संबंधित प्रत्येक बाबीला साहित्याचा आणि सर्जनशीलतेचा स्पर्श असतो.” लोकांच्या संघर्षातून साहित्य आणि लोकगीते जन्माला येतात, असे नमूद करत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील साहित्यिक योगदानाचा संदर्भ दिला. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून आणि लोकगीतांतून समाजातील संघर्ष प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या लेखनातून वैचारिक साहित्याची निर्मिती केली, तसेच वि. स. पागे यांच्या विधिमंडळावरील लेखनातून मराठी भाषेचे वेगळेपण आणि समृद्धी दिसून येते.आचार्य अत्रे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या परस्परांतील वैचारिक संघर्षाच्या आठवणी सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्यांच्या वक्तव्यांमध्ये तीव्रता असली तरी त्यामध्ये आपलेपणा होता. “मतभेद असले तरी मनभेद होता कामा नये,” हा संदेश त्यांनी यावेळी दिला. सोशल मीडियावरील भाषेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आज समाजमाध्यमांवर वापरली जाणारी भाषा ही अनेकदा माणसाचा माणसावरील विश्वास कमी करणारी ठरत आहे. त्यामुळे चांगले साहित्य लिहिणाऱ्या व्यक्तींवरही काही प्रमाणात बंधने निर्माण होत आहेत. समाजमाध्यमांवरील भाषा आणि वर्तन याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. साहित्याच्या निमित्ताने संवाद वाढला पाहिजे आणि मतभेदांपलीकडे संवादाचे पूल टिकले पाहिजेत.मराठी भाषेचे संवर्धन करणारी प्रतिनिधी म्हणून आपण या संमेलनात सहभागी झाल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी विविध प्रकारचे साहित्य वाचावे, असे आवाहन केले. राजकीय नेत्यांना लेखनासाठी स्वतंत्र वेळ मिळत नसला, तरी त्यांच्या भाषणांमध्ये त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील अनुभव प्रतिबिंबित होत असतात, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
Source link
नांदी साहित्य संमेलनात 'राजकीय साहित्यावर' संवाद:राजकारणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन