![]()
लष्करी नर्सिंग सेवा (एमएनएस) स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे गॅरिसनमधील एमएनएस अधिकाऱ्यांनी शतकपूर्ती सोहळा उत्साहात साजरा केला. ‘स्मितहास्यासह सेवा’ हे ब्रीद घेऊन एमएनएसच्या अधिकाऱ्यांनी सशस्त्र दलातील जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देताना समर्पण, व्यावसायिकता आणि सेवाभावाची परंपरा कायम राखली आहे. शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त दक्षिण कमांडच्या एमएनएस मुख्यालयाच्या ब्रिगेडियर श्रीलेथा पी. एस. तसेच कार्यरत आणि माजी एमएनएस अधिकाऱ्यांनी दक्षिण कमांड मुख्यालयातील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. यानिमित्त एएफएमसी येथील तपोवन लॉन्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या वेळी लष्करी नर्सिंग सेवेतील अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय योगदानावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. एमएनएस अधिकाऱ्यांनी लष्करी समुदायासाठी दिलेल्या सेवेसोबतच त्यांच्यातील संघभावना, परस्पर सहकार्य आणि बांधिलकीचे दर्शन या माहितीपटातून घडविण्यात आले. शंभर वर्षांच्या प्रवासात लष्करी नर्सिंग सेवेने सशस्त्र दलातील आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, समर्पण आणि करुणेच्या माध्यमातून सेवाभावाची ही परंपरा पुढे नेली जात आहे. एनसीसीच्या विस्ताराचा आढावा; मुलींच्या सहभागावर भर राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी) महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वात्स यांनी पुणे ग्रुप मुख्यालयाला भेट देऊन एनसीसीच्या विविध उपक्रम, प्रशिक्षण सुविधा आणि विस्तार योजनांचा आढावा घेतला. युवक सक्षमीकरण, ‘नारी शक्ती’, कौशल्यविकास, ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर त्यांनी भर दिला. महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिन शिबिर-२०२७ साठी निवड प्रक्रियेत सहभागी मुलींच्या कॅडेट्सशीही संवाद साधण्यात आला. महाराष्ट्रातील मुलींनी सलग तीन वर्षे ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’ पुरस्कार मिळवल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील एनसीसी विस्तारासाठी आवश्यक प्रशिक्षण व पायाभूत सुविधांबाबतही चर्चा झाली.
Source link
लष्करी नर्सिंग सेवेच्या शताब्दी वर्षाचा पुण्यात समारोप:दक्षिण कमांड मुख्यालयातील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत वाहिली आदरांजली