![]()
ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक अत्यंत आक्रमक झाले असतानाच, आता खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक जुनी, अत्यंत वादग्रस्त ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर पोस्ट करून राजकीय बॉम्ब टाकला आहे. “ठाण्याचे आता ‘बीड’ झाले असून घरात गुंड घुसवून संपवण्याची भाषा करणाऱ्या या लेडी डॉनला नेमके कोण वाचवत आहे?” असा थेट सवाल संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत विचारला आहे. संजय राऊतांकडून ऑडिओ क्लिप शेअर; भाषेवरून संताप ठाणे महापालिका निवडणुकीच्या काळातील मीनाक्षी शिंदे यांची कथित जुनी ऑडिओ क्लिप पुन्हा एकदा चर्चेत आणत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्ला चढवला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीशी बोलताना अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. “माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या का?” असा संताप व्यक्त करत, घरात माणसे घुसवून मारण्याची आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना सांगून एकेकाची वाट लावण्याची भाषा केली गेल्याचा दावा केला जात आहे. राऊतांचे थेट ट्वीट: “ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे, त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा. ठाण्याच्या पोलीस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन, पूर्णेकरांच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय! हिची अटक कधी होणार? ठाण्याचे ‘बीड’ झाले आहे. या लेडी डॉनला कोण वाचवतेय? पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय? अमित शाह यांनी कोठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र? ठाणेकरांनो जागे व्हा, बोला, व्यक्त व्हा, रस्त्यावर उतरा!” मुख्य आरोपी पप्या शिंदेसह साथीदार ताब्यात, दुचाकी जप्त प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा आणि कापूरबावडी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. गुन्हे शाखेने मिरा रोड परिसरातून तीन महिला आणि दोन पुरुषांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुन्हा घडण्यापूर्वी हे सर्वजण मुख्य आरोपी पप्या शिंदे याच्या सतत संपर्कात होते. हल्लेखोरांनी ज्या दोन मोटारसायकलवरून येऊन हा गोळीबार केला होता, त्या दोन्ही दुचाकी कापूरबावडी पोलिसांनी शोधून काढल्या असून त्या जप्त करून पोलीस ठाण्यात आणल्या आहेत. आदित्य ठाकरे-राऊतांचे ठिय्या आंदोलन बुधवारी सकाळी पप्प्या शिंदेला अटक झाल्यानंतरही पूर्णेकर कुटुंबीयांच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी संशयितांविरोधात औपचारिक प्रक्रिया सुरू केली. पूर्णेकर कुटुंबीयांचा मीनाक्षी शिंदेंच्या पतीवर थेट संशय प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाने आणि नातेवाईकांनी या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या पतीने हल्ल्यापूर्वी बैठका घेतल्याचाही गंभीर दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी पूर्णेकर कुटुंबीयांना आश्वासन दिले आहे की, ज्या ज्या व्यक्तींवर कुटुंबाने संशय व्यक्त केला आहे, त्या सर्वांना चौकशीसाठी पाचारण केले जाईल. त्यामुळे आता ठाणे पोलीस सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे किंवा त्यांच्या पतीला प्रत्यक्ष चौकशीसाठी नोटीस बजावणार का? याकडे संपूर्ण ठाण्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. —————————————– हेही वाचा… प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. या दुःखाच्या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट ठाण्यात धाव घेत पूर्णेकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा थेट इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
ठाण्याचे बीड झालंय, या लेडी डॉनला कोण वाचवतंय?:माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप ट्वीट करत संजय राऊतांचा गंभीर आरोप