![]()
राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे संकट अधिक गंभीर झाले आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता रब्बी हंगामावरही संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे. आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरे न करता साधेपणाने साजरे करावेत. उत्सवांवरील खर्च कमी करून तो निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, असे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. यंदा पावसाने दगा दिल्याने अनेक भागांतील पिके वाया गेली आहेत. शेतात उभी असलेली पिके पाण्याअभावी करपली असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अन्नदाता असलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे,’ असे सांगत शिंदे यांनी सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे नमूद केले. मात्र, केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सध्या शेतकरी संकटात असताना राज्यात आगामी काळात होणारे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. नवरात्रोत्सव तसेच पुढील काळातील इतर उत्सव, समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने आयोजित करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. उत्सवांसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून वाचणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी द्यावा, अशी विनंती त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संस्था आणि राज्यातील जनतेला केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. उत्सवाचा खर्च वाचवून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आणता आला, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरी सेवा ठरेल, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळाच्या उपाययोजना दरम्यान, राज्यातील पावसाची स्थिती आणि शेतीच्या नुकसानीचा विचार करून सरकारने दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळासंदर्भातील मदत आणि सवलती लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अशा उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. पाणीटंचाई असलेल्या भागांत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यावरही भर दिला जाणार आहे. खरीप हंगामानंतर रब्बीचीही चिंता पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली, तर काही भागांत पिके पूर्णपणे करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आता रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावा आणि पाणीसाठाही उपलब्ध नसल्याने पुढील पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता यामुळे ग्रामीण भागातील अडचणी वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या मदतीसोबतच सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, हा एकनाथ शिंदे यांच्या आवाहनामागील मुख्य उद्देश आहे. हेही वाचा… दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा:शेती कर्जवसुलीला स्थगिती, पीक कर्ज पुनर्गठनाचे फडणवीस सरकारचे आदेश पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रावर कोरड्या दुष्काळाचे मोठे संकट ओढवले आहे. राज्याचा जवळपास ७५ टक्के भाग दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असताना, राज्य सरकारने बळीराजाला एक मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेती कर्ज वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा…
Source link
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचे जनतेला भावनिक आवाहन:नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन, म्हणाले, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच जगदंबेची खरी सेवा!