Headlines

2 तोळे सोन्यासाठी गरोदर सुनेचा छळ:सिझेरियनचा खर्च नाकारल्याने स्वातीचा बाळासह मृत्यू, पतीसह 4 जणांवर गुन्हा




माहेरहून 2 तोळे सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा आणि गंभीर प्रकृती असतानाही वैद्यकीय उपचारांसाठी मदत न केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात समोर आला आहे. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या 26 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सासरच्या मंडळींनी शस्त्रक्रियेचा खर्च करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने संबंधित महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चार जणांविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीक्षा ऊर्फ स्वाती विशाल निंबाळकर (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे. ती पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे सासरी राहत होती. तिचे वडील सदाशिव शंकर देशमुख हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्वातीच्या लग्नानंतर काही दिवसांनीच सासरच्या मंडळींकडून माहेरहून 2 तोळे सोने आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. या मागणीवरून तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गरोदरपणातही सोन्यासाठी छळ सुरूच स्वाती गरोदर असतानाही सासरच्या मंडळींकडून सोन्याच्या मागणीसाठी तिचा छळ सुरू होता, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. गरोदरपणात महिलेला विशेष काळजी आणि वेळेवर वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. मात्र, स्वातीला या काळातही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनचा दिला होता सल्ला 6 सप्टेंबर रोजी स्वातीची प्रकृती खालावल्याने तिला तपासणीसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता गर्भातील बाळाभोवती असलेल्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. तसेच बाळाच्या गळ्याभोवती नाळ वेढली गेल्याचेही तपासणीत समोर आले. त्यामुळे आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप स्वातीच्या वडिलांनी केला आहे. विशेष म्हणजे, स्वातीच्या माहेरच्या लोकांनी उपचारांचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. तरीही आरोपींनी तिला रुग्णालयात दाखल होऊ दिले नाही, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वेळेत शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. 25 सप्टेंबरला आई आणि बाळाचा मृत्यू स्वातीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. अखेर 25 सप्टेंबर रोजी तिची अवस्था गंभीर झाली. त्यानंतर रात्री 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास तिला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वाती आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पती, सासू-सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा या घटनेनंतर स्वातीचे वडील सदाशिव देशमुख यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सासरच्या मंडळींनी संगनमत करून स्वातीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिची प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू दिले नाहीत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे स्वाती आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी पाचोड पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये विशाल अनिल निंबाळकर (पती), अनिल रंगनाथ निंबाळकर (सासरे), शारदा अनिल निंबाळकर (सासू) आणि ऐश्वर्या (नणंद) यांचा समावेश आहे. पोलिसांनी एफआयआर क्रमांक 406/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 85, 106(1) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत. तक्रारीतील आरोपांची तपासणी आणि घटनेमागील नेमकी परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. हेही वाचा…. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. या दुःखाच्या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट ठाण्यात धाव घेत पूर्णेकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा थेट इशारा दिला आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *