Headlines

अभिजित दीपकेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान?:‘कॉकरोच’च्या फोटोवरून नितेश राणेंचा संताप, माफी मागण्याची मागणी




कॉकरोच जनता पार्टीकडून 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर गंभीर आरोप करत छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अवमान केल्याचा दावा केला आहे. दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोवरून राणे यांनी आक्षेप घेतला असून, या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली मावळ्यांच्या जागी कॉकरोच दाखवण्यात आले आहेत. हा प्रकार शिवाजी महाराजांचा अवमान करणारा असल्याचा आरोप राणे यांनी केला. महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि देशभक्त हा कथित अपमान सहन करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले. राणे यांनी आणखी एका फोटोचा संदर्भ देत त्यावरही आक्षेप घेतला. या फोटोमध्ये महात्मा गांधी यांच्या पायाजवळ ‘शिवाजी पार्क’ असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अशा पद्धतीने वापरणे योग्य नसल्याचे सांगत राणे यांनी दीपके यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. ‘आंदोलनाचा उद्देश काय?’ राणेंचा सवाल 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनावरूनही नितेश राणे यांनी दीपके यांच्यावर निशाणा साधला. कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर दीपके यांनी ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची भूमिका जाहीर केली. मात्र, या आंदोलनामागे नेमका उद्देश काय आहे, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. दीपके यांच्याशी व्यक्तिगत कोणताही प्रश्न नसल्याचे सांगत, ते कोणत्या व्यक्तींना आणि विचारांना समर्थन देतात, यावर आपला आक्षेप असल्याचे राणे म्हणाले. उमर खालिदच्या समर्थनाचा राणेंकडून उल्लेख नितेश राणे यांनी अभिजित दीपके यांच्या कथित उमर खालिद समर्थनावरूनही टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दीपके ज्या व्यक्तींचे समर्थन करतात, त्यांच्याशी संबंधित आंदोलनांमध्ये देशविरोधी घोषणा आणि देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आणि ओळख असल्याचे सांगत राणे यांनी, महाराजांच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर करून आंदोलन केले जात आहे का, असा सवाल उपस्थित केला. ‘महाराष्ट्रात लोकशाही आहे, कुणीही घाबरत नाही’ आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रात लोकशाही असल्याचे सांगत नितेश राणे यांनी आंदोलन करण्याला विरोध नसल्याचे म्हटले. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान किंवा देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. राणे यांनी आंदोलनकर्त्यांना महाराष्ट्राबाहेर अशा प्रकारचे आंदोलन करून दाखवण्याचे आव्हानही दिले. आंदोलनामागील विचारधारा आणि त्यांना मिळणारा पाठिंबा यावरून त्यांनी दीपके यांना लक्ष्य केले. ‘शिवरायांचा अपमान झाला तर राजकारण बाजूला ठेवा’ या संपूर्ण वादात राजकीय पक्षीय भूमिका बाजूला ठेवण्याचे आवाहन करत नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही टीका केली. याचवेळी त्यांनी कुणाल कामरा यांनी सीतामातेबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत, त्यावेळी विरोधकांनी कोणती भूमिका घेतली, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे अभिजित दीपके यांच्या सोशल मीडिया पोस्टपासून सुरू झालेला हा वाद आता 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाला आहे. हेही वाचा…. दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय, तरी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही:वाल्मीक कराड प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाल्मीक कराड-संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील सुमारे 70 ते 75 टक्के भाग दुष्काळाने होरपळत असल्याचा दावा करत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. त्याचवेळी वाल्मीक कराड प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *