Headlines

सुप्रिया सुळे यांची MPSC आंदोलनस्थळी भेट:रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेची मागणी




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (२) भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या मागण्या आणि भावना जाणून घेतल्या. राज्यात सातत्याने आंदोलने करण्याची वेळ नागरिकांवर का येत आहे, याचे सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचे हे वय आंदोलन करण्याचे नाही. त्यांनी अभ्यास करून परीक्षा देणे आणि करिअर घडवणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ही गंभीर बाब आहे,” असे सुळे म्हणाल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवाद साधण्यासाठी जबाबदार व्यक्ती पाठवावी, अशी मागणीही सुळे यांनी केली. एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले. पेपरफुटी, निकालातील विसंगती, मूल्यांकनाबाबतचे आक्षेप आणि भरती प्रक्रियेतील विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची ३० सप्टेंबरला चर्चा झाली होती. त्यानंतर काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले; मात्र एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. सुळे यांनी या पार्श्वभूमीवर “आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोष देण्याऐवजी अशी परिस्थिती वारंवार का निर्माण होते, याचा विचार सरकारने करावा,” असा मुद्दा मांडला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा ठोस संवाद आणि तोडगा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *