Headlines

गांधीजींचा सत्याग्रह विश्वमानवतेसाठी- डॉ. उल्हासदादा पवार:एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी




“संपूर्ण जग आज युद्धाच्या छायेत अस्वस्थ आहे. अशा वेळी गांधी जयंती ही संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक अहिंसा दिन म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते, हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह हा मूलमंत्र गांधीजींनी दिला. गांधीजींचा सत्याग्रह हा विश्वमानवतेसाठी होता,” असे विचार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, माईर्स एमआयटी शिक्षण समूह व पीस विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर मंडपात आयोजित “स्मरण महामानवांचे” या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, एमआयटीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एस. एन. पठाण, प्रा. डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे, लेखक अनिल जोशी, डॉ. विनोदकुमार जाधव, विष्णू भिसे, कर्नल तांदळे आणि बिपीन जोशी उपस्थित होते. डॉ. उल्हासदादा पवार म्हणाले, “गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाला प्राधान्य दिले. सर्वधर्मसमभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विचार समाजात रुजावा, तसेच भारतातील कोणताही समाज जाती आणि धर्माच्या आधारावर विभागला जाऊ नये, असा त्यांचा विचार होता. मानवता, समता व नैतिकता या तीन मूल्यांवर आधारित सत्याग्रहातून संघर्ष उभा करण्याचे तत्त्व न्या. रानडे यांनी गांधीजींना दिले. लाल बहादूर शास्त्री हे गांधीजींचे शिष्य होते. शांतता, नम्रता आणि तत्त्वांप्रती निष्ठा ठेवून शास्त्रींनी देशसेवा केली. गांधी आणि शास्त्रींच्या विचारांची जाणीव ठेवून त्याच मूल्यांवर डॉ. विश्वनाथ कराड यांचे कार्य सुरू आहे.” प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “सत्य, अहिंसा आणि शांती हेच खरे मानवी जीवनाचे तत्त्व आहे. धर्मग्रंथ हेच खरे जीवनग्रंथ आहेत हे ओळखून गांधीजी सतत शांतीच्या मार्गाने वाटचाल करत राहिले. गांधींचा आणि बुद्धांचा देश म्हणूनच आज जगात भारताची ओळख आहे. आज जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थितीत गांधीजींच्या सत्य, अहिंसा, प्रेम, शांती आणि विश्वमानवतेच्या विचारांची गरज आहे. सत्याचे सातत्य टिकवणारे सत्याग्रही महात्मा गांधी हेच आज विश्वशांतीचा आणि विश्वकल्याणाचा एकमेव विचार आहेत.” डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “या देशात गांधींच्याच विचारांची गरज आहे. एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात गांधीजींचे विचार अभ्यासक्रमात शिकवले जातात. वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवत राहू.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *