![]()
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत गुरुवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री सहा घरे फोडून रोख रक्कम व दागिने, असा एकूण ७ लाख ३३ हजारांचा ऐवज चोरला.
.
चोरट्यांनी माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पारवे यांच्या घरात प्रवेश करून अलमारीतील ५० हजार रुपये रोख चोरले. त्यानंतर शेजारील शेख बाबू यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील १० हजार रुपये रोख व काही सोन्याचे दागिने पळवले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शांताबाई मोतीराम जाधव यांच्या घराकडे वळवला. घरी कुणी नसल्याची संधी साधत त्यांनी घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून तीन तोळ्यांचे सव्वा पीस, गंठण, एकदाणी असा ४ लाख ५० हजारांचा ऐवज व ६५ हजार रुपये रोख, असा एकूण ५ लाख १५ हजारांचा ऐवज असलेली पेटी लंपास केली. त्यानंतर बाजार परिसरातील महादेव गिराम यांच्या घरात प्रवेश केला. ८ हजार रुपये रोख चोरले. त्यानंतर चोरटे कुरेशी मोहल्ल्यात आले. मुस्तकीम कुरेशी यांच्या घराचे चॅनलगेट उघडून घरात प्रवेश केला. कुरेशी यांच्या कपाटातील दीड लाख रुपये रोख चोरले.या चोरीच्या घटनांत एकूण ७ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी जामा मशीद व लक्ष्मण बोकन यांच्या सराफा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. बोकन यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ४ ते ५ चोरटे बाजार रस्त्याने जात असल्याचे निदर्शनास आले. परंतु चोरट्यांचे चेहरे मात्र दिसत नाहीत.