Headlines

कामगिरी:आशियाई रौप्यविजेत्या सर्वेशचे जल्लोषात स्वागत



जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २.२५ मीटर उंच उडीची नोंद करत रौप्यपदक पटकावणाऱ्या देवगावचा भूमीपूत्र सर्वेश अनिल कुशारे याचे शुक्रवारी (दि. २) सकाळी देवगाव-रुई रोडपासून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

.

सर्वेशच्या या कामगिरीने देवगावसह निफाड तालुका आणि नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिलांनी औक्षण करून, तर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत सर्वेशचे स्वागत केले. यावेळी साकेत बौद्ध विहार समितीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वेशने २.२५ मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवली. प्रतिस्पर्धी खेळाडूनेही याच उंचीची उडी नोंदवली. मात्र, प्रयत्नांच्या क्रमवारीनुसार सर्वेशला रौप्यपदक मिळाले. यापूर्वी ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याने २.२५ मीटर उंच उडी नोंदवत रौप्यपदक पटकावले होते. सरावासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही सर्वेशने उपलब्ध साधनांचा कल्पकतेने वापर केला. मक्याचा भुसा पोत्यांमध्ये भरून त्यावर उड्यांचा सराव करण्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदकापर्यंत पोहोचला. त्यामुळे त्याची कामगिरी ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.यावेळी प्रशिक्षक रावसाहेब जाधव, उपसरपंच लहानु मेमाने, पोलिस पाटील सुनील बोचरे, विनोद जोशी, शामराव लोहारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आज मिरवणूक; शांतिगिरी महाराजांच्या हस्ते सत्कार सर्वेशच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदकाचा गौरव करण्यासाठी शनिवारी (दि. ३) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत देवगावात मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात सत्कार सोहळा होणार आहे. यावेळी जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते सर्वेशचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *