![]()
येथील इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ‘इच्छापूर्ती हॉटेल’ची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री १ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हॉटेलचे मालक दादाजी जाधव व त्यांचे भाऊ रात्री हॉटेल बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मागील भिंतीला भगदाड पाडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. डब्यात ठेवलेली १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही रक्कम जाधव यांच्या नातेवाईकाने सांभाळण्यासाठी दिली होती. त्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. सकाळी ग्रामस्थांना भिंतीला पडलेले भगदाड दिसले. त्यांनी दादाजी जाधव यांना माहिती दिली. देवळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. ठसेतज्ज्ञांनीही नमुने घेतले. अधिक तपास सुरू आहे.
Source link